पर्वरी : मद्याच्या नशेत भरधाव वेगाने जीप चालवून दिव्यांग मासे विक्रेत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित नरेश जैन याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवारी, दि. १६ रोजी पहाटे पर्वरी महामार्गावर हा अपघात झाला होता. या अपघातात कित्तू बेहेरा यांचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, संशयित वाहनचालक नरेश जैन याने जामिनासाठी अर्ज केला असता सरकारी वकील रॅलस्टोन बार्रेटो यांनी संशयिताने जाणीवपूर्वक मद्यपान करून वाहन चालवले आहे. तो अपघातास कारणीभूत झाला असून कलम ३०४ अन्वये त्याला जामीन मिळू नये अशी मागणी न्यायालयात केली. यावेळी वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर करण्यात आले.
संशयिताच्या बाजूने ॲड. मायकेल नाझारेथ काम पाहात आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी दि. २३ जानेवारी रोजी होणार असून वाहन चालकाने मद्यपान केले असल्याबद्दलचा अहवाल सादर करण्यास पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वामन नाईक तपास करीत आहेत.