लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: स्मार्ट सिटीच्या नावाखाली शेकडो वर्षांपूर्वीची झाडे आणि वारसास्थळे सरकारकडून नष्ट करण्यात येत आहेत. पणजीत विविध अशी झाडे आणि वारसास्थळे आहेत, जी धोक्यात आली आहेत. टोंक येथील शंभरपेक्षा जास्त वर्षांचे झाड जे लोकांना सावली देत होत होते, ते मनपातर्फे रस्ता करण्याच्या नावाखाली तोडण्यात आले, तसेच येथे पोर्तुगीजकालीन एक स्तंभही आहे, या स्तंभाची स्थिती या खोदकामामुळे बिकट झाली आहे. हा अंत्यत दुर्दैवी प्रकार आहे, असे मत इतिहासतज्ज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केले.
टोंक येथे गोवा हेरीटेजचे प्रा. प्रजल साखरदांडे, गोवा बोटॅनिकल संस्थेचे अध्यक्ष अॅनियल डिसोझा, जॅक अजित सुखेजा व इतर पर्यावरणप्रेमींनी मिळून शंभर वर्षे जुने चिंचेच्या झाडाची कत्तल करण्याचा निषेध केला. "चिंचेचे झाड मुद्दाम गतीने कापले असून, याचा आम्ही निषेध करत आहोत. ३ नोव्हेंबर १८५९ मध्ये सांतईनेझ ते दोनापावला याला जोडणारा रस्ता बनविण्यात आला आणि त्याकाळी उद्घाटन केलेली माहितीची पाटी झाडाजवळ स्तंभाच्या रूपात आहे. बहुतेक हा स्तंभही येथून हटविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यपाल आणि महानगरपालिकेला पत्र लिहून हा स्तंभ सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे..
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"