पणजी: भारतीय महासागरात कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला चक्रीवादळ निर्माण झाले असून ते वेगाने अरबी समुद्रातून लक्ष्यद्वीप द्वीपसमूहांच्या दिशेने सरकत आहे. या चक्रीवादळाला ओख्खी हे नावही पडले आहे. तिरुअनंतपुरमच्या दक्षिणेला ७० किलोमीटरवर तर कन्याकुमारीच्या नैऋत्य दिशेला तितक्याच अंतरावर ओख्खी चक्रीवादळ पोहोचले आहे. ताशी ९० ते १०० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने किना-याच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत हे चक्रीवादळ सरकत असल्यामुळे केरळ किनारपट्टी व तामिळनाडू किनारपट्टीवर वादळी वा-यासह जोरदार पावसाचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. ओख्खी चक्रीवादळाची गती गुरूवारी रात्री ११.३० वाजता ताशी ९० ते १०० किलोमीटर इतकी होती. शुक्रवारी ते आणखी गतीमान होऊन ताशी ११० ते १२० किलोमीटर वेग धरू शकते. तर शुक्रवारी मध्यरात्री आणि शनिवारी सकाळी हे चक्रीवादळ सर्वात अधिक धोकादायक ठरू शकते. ताशी १३० किलोमीटर पर्यंतत्याचा वेग वाढू शकतो असे हवामान खात्याच्या गुरूवारच्या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. गोव्यात या वादळाचा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार नसला तरी जोराचा वारा सुटू शकतो. तसेच पावसाच्या सरीही कोसळू शकतात. समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाणे धोकादायक ठरू शकते. हवामान खात्याने मच्छिमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात ओख्खी चक्रीवादळ पोहचले, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 8:09 PM