पणजीः निसर्ग चक्रीवादळ हे गोव्यापासून दूर पोहोचले असले तरी त्याचे पडघम गोव्यात अजूनही वाजत आहेत. गोव्यात बुधवारी जोरदार पाऊस पडला. चक्रीवादळाचे परिणाम गुरूवारपर्यंत जाणवतील.
बुधवारचा दिवस उगवला तो वादळी वारा आणि पाऊस घेऊनच. मंगळवारी दिवस व रात्रभर पावसाच्या सरी कोसळत होत्या आणि त्या बुधवार सकाळपर्यंत राहिल्या. मंगळवारी सकाळी 8.30 ते बुधवार सकाळी 8.30 या 24 तासात 5 इंच इतका पाऊस पडला. त्यामुळे राज्यातील बहुतेक सर्व शहरे जलमय झाली. पणजी शहरातील बहुतेक रस्ते पाण्याखाली गेले होते. बांबोळी येथील महामागार्गाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाला भुयारी स्वीमिंग पूलचे स्वरूप आले होते.
वादळी वाऱ्यामुळे मोठ मोठे वृक्ष कोसळून रस्त्यावरील वाहतूक खोळंबण्याच्याही घटना घडल्या. समुद्र खवळलेलाच होता, परंतु मंगळवारपेक्षा परिस्थितीत सुधार जाणवतो. उसळणाऱ्या लाटांचीही उंची कमी झाली आहे.
चक्रीवादळ राजगड किनारपट्टीलगतच्या भागातून पुढे उत्तरेला सरकले असून ताशी 100 ते 110 किमी वेगाने ते भुभागात शिरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. गोव्यापासून ते दूर पोहोचल्यामुळे गोव्यात फार नुकसानीची शक्यता नाही, परंतु परिणाम हे जाणवणार आहेत अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.