लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'दाबोळी'वरून विमान कंपन्यांचे स्थलांतर तसेच इतर प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री के. राममोहन नायडू यांची दिल्लीत भेट घेतली. दावोळी विमानतळही चालू रहावा यासाठी ज्या काही गोष्टी करणे आवश्यक आहेत त्या केल्या जाव्यात, अशी मागणी नायडू यांच्याकडे करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांसोबत पर्यटनमंत्री रोहन खंवटे, वाहतूकमंत्री माविन शुदिन्हो उपस्थित होते. यावेळी त्यांनी हताई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई वाहतूक सचिव खुमलुनमांग वाउलनम तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. सुरेश यांच्यासोबत चर्चा केली.
दाबोळी विमानतळावरून मोठ्या प्रमाणात विमान कंपन्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थलांतर करू लागल्या आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोकांमध्ये 'दाबोळी' बंद पडेल की काय?, अशी भीती आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनाही या प्रश्नावर तीत पडसाद उमटले होते.
या प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, विमान कंपन्यांचे स्थलांतर तसेच 'दाबोळी वरील प्रश्नांची कल्पना आम्ही केंद्रीयमंत्र्यांना दिलेली आहे. दाबोळी विमानतळावर पायाभूत सुविधा तसेच देश, विदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांहून कनेक्टिव्हिटी वाढवावी, विमान कंपन्यांना 'दाबोळी'वर जादा सवलती द्याव्यात, जेणेकरुन त्या स्थलांतर करणार नाहीत, अशी मागण्या आम्ही केल्या. नायडू यांनी यात सहानुभूतीपूर्वक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनची परिषद येत्या महिन्यात गोव्यात होणार आहे. त्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री काल रात्री उशिरा गोव्याकडे येण्यास रवाना झाले. आज शुक्रवारी सायंकाळी ते मोपा विमानतळावरील टॅक्सी व्यावसायिकांची भेट घेणार आहेत.
दोन्ही विमानतळ चालू राहणे गरजेचे
गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने दरवर्षी देश, विदेशी पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. या अनुषंगाने दळणवळण सुविधाही अधिकाधिक निर्माण होणे आवश्यक आहे. गोव्यासाठी 'मोपा' आणि दाबोळी' या दोन्ही विमानतळांची नितांत गरज आहे. 'दाबोळी चालूच रहायला हवा त्यासाठी तेथील पायाभूत सुविधा वाढवाव्यात. असे साकडे नायडू यांना घालण्यात आले.