लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: तिळारी वगळल्यास राज्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र, पुराची कुठलीही भीती नसल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल विधानसभेत दिली.
राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झालेले नाही. मात्र, धरणाच्या स्पिल-वेवरून पाणी येत आहे. गोव्यात सर्व धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, गोव्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. परंतु, पुराचा धोका नाही. डिचोली, शिवोली, कांदोळी येथे पावसाचे पाणी साचले होते. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने चिंतेची बाब नाही. तिळारी मात्र ओव्हरफ्लो झाले नसल्याने स्थिती नियंत्रणात आहे. तिळारी धरणाचे दरवाजे दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी बंद केले जातात. त्यामुळे ते नियोजित दिवशी बंद केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात साळावली, चापोली, अंजुणे, आमठाणे, म्हैसाळ, आदी धरणांमध्ये जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याने ही धरणे आतापासूनच तुडुंब वाहू लागली आहेत. त्यामुळे मध्यंतरी सरकारने या धरण परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशाराही जारी केला होता. मात्र, सध्या धरणांबाबतची स्थिती नियंत्रणाखाली आहे.