लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: उन्हाळा जवळ येत असल्याने पिण्याच्या पाण्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील धरणे ५० ते ७० टक्के भरलेली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांची गरज भागवणारे साळावली धरण ७३ टक्के भरले आहे. यंदा भरपूर पाऊस झाल्याने ही स्थिती आहे. ७ जुलै २०२२ रोजी साळावली धरण तुडुंब भरले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग करावा लागला. धरणातील पाण्याची पातळी क्षमतेच्याही वर ११० टक्क्यांवर पोचली. काणकोण तालुक्याची तहान भागवणाऱ्या चापोली धरणाची पाणी पातळी ७२ टक्के आहे.
बार्देश आणि डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या आमठाणे जलाशयातील पातळी ६९ टक्के आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत गोव्याला तिळारी कालव्यांची सुमारे २२ वर्षांनी मोठी डागडुजी हाती घेण्यात आली. त्यामुळे काहीशी समस्या झाली. आमठाणे धरणातून पंपिंग करून पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला घेण्यात आले.
सत्तरी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या अंजुणे धरणाची पाण्याची पातळी ५६ टक्के आहे. गावणे व पंचवाडी धरणे अनुक्रमे ६५ टक्के व ४८ टक्के भरलेली आहेत. गोव्यात नद्यांवर ३०० पेक्षा जास्त बंधारे आहेत, जेथे कच्चे पाणी साठवले जाते. उन्हाळ्यात कमतरता भासल्यास हे पाणी वापरले जाते. चांदेल आणि कळणा येथे बंधारे आहेत. तेथून पाणी उपसून पेडणे तालुक्याची गरज भागवली जाते. शापोरा व साळ येथील बंधाऱ्यांमधून पाणी उपसा करून येथील पाणी घेतले जाते. खांडेपार नदीवर आणखी १४ बंधारे आहेत, तेथून ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"