लोकमत न्यूज नेटवर्क केपे : शाळा धोकादायक स्थितीत आहे, याची जाणीव करून देऊनसुद्धा सरकारने मोरपिर्ला शासकीय उच्च माध्यमिक स्कूलच्या इमारत दुरुस्तीचे केवळ आश्वासन दिले. ते आश्वासन पाळले नाही. सरकारने आम्हाला दिलेली आश्वासने अद्याप हवेतच आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मुलांना या धोकादायक इमारत असलेल्या शाळेत पाठविणार नाही, असा ठाम निर्धार रविवारी मोरपिर्ला गावातील पालकांनी केला.
राज्यात आज, सोमवारपासून (दि. ५ जून) नवे शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. मात्र, जोपर्यंत शाळेची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत या धोकादायक बनलेल्या शाळेच्या इमारतीत आमच्या मुलांना पाठविणार नाही असा निर्णय पालकांनी जाहीर केला. यावेळी सुमारे १०० हून अधिक पालक उपस्थित होते. पालकांनी मोठ्या संख्येने शाळेबाहेर एकत्र येऊन सरकारला बहिष्काराचा इशारा दिला.
पालक आर्यन गावकर म्हणाले, 'मागील बैठकीमध्ये जेव्हा शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन शाळेची पाहणी केली होती, तेव्हा झालेल्या बैठकीत त्यांनी आम्हाला मुलांना पाच तारखेला शाळेला पाठविण्याचे आवाहन केले. त्यावेळी बैठकीत पालकांनी शाळा इमारत धोकादायक असल्याने एखादा अपघात अथवा दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल केला होता. याबाबत लेखी हमी देण्याची मागणी केली. मात्र, त्या अधिकाऱ्यांनी लेखी देण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही पालकांनी निर्णय घेतला आहे की, सध्या शाळा ज्या धोकादायक परिस्थितीत आहे ते पाहता आपल्या मुलांना संकटात ढकलणे शक्य नाही. त्यामुळे पालकांनी सोमवारी शाळेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत शिक्षण खाते योग्य तोडगा काढत नाही किंवा शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत मुलांना पाठविणार नाही.'
पालक राजेंद्र वेळीप म्हणाले, 'मोरपिर्ला स्कूलच्या आवारात शाळेच्या तीन वेगवेगळ्या इमारती आहे. त्यात एक प्राथमिक शाळा तसेच अन्य हायस्कूलच्या इमारती आहेत. तिन्ही इमारतीची गेल्या ४० वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. सरकार याबद्दल फक्त आश्वासन देत आहे. आम्हाला सरकार सांगते की, तुमच्या मुलांना शाळेला पाठवा. पण जर कुठली दुर्घटना • घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल वेळीप यांनी केला
मुलांना शाळेबाहेर उभे करु
पालकांनी सांगितले की, 'सरकारने शाळेच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते; पण ते पूर्ण केलेले नाही. सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. मात्र, जोपर्यंत सरकार आम्हाला शाळा दुरुस्तीविषयी निर्णय घेत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना दररोज स्कूलच्या बाहेर घेऊन उभे राहू, पण मुलांना शाळेमध्ये पाठविणार नाही.'
शाळांमध्ये आजपासून मुलांचा किलबिलाट
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही सोमवार पासूनच होणार असल्याचे शिक्षण खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतचे वर्ग भरणार आहेत. शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले की, इयत्ता पहिली ते इयत्ता १२ वीपर्यंतचे वर्ग सोमवारी सुरू होणार आहेत. इयत्ता पहिली, पाचवी आणि अकरावीचे अजून प्रवेश पूर्ण न झालेले असू शकतात किंवा प्रवेश प्रक्रिया झाली असली तरी प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी इतर तांत्रिक समस्या असू शकतात. त्यामुळे या वर्गांना काही प्रमाणात सवलत दिली जाऊ शकते. हे तिन्ही वर्ग सोमवारीच सुरू झाले पाहिजेत, असा आग्रह नाही.
आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काम केले आहे. सर्व वर्गखोल्या रंगवल्या आहेत. शाळेत तीन स्मार्ट क्लासरूम आहेत. रोबोटिक्स लॅब आहे. - मारिया मुरेना मिरांडा, मुख्याध्यापिका