अप्पा बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : दर दोन दिवसांनी फोंड्यात घरफोडीचे प्रकार होत असून, शनिवारी मध्यरात्रीनंतर शांतीनगर येथे चोरट्यानी एकाच रात्रीत दोन ठिकाणी धाडसी दरोडा घातल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, लोकांनी पोलिसांच्या कार्यपद्धती बद्दल संशय व्यक्त केला आहे.
सविस्तर वृत्तानुसार शांतीनगर येथे राहणारे श्रीधर कुलकर्णी हे आपल्या कुटुंबीयांसह हुबळी येथे आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांच्या लग्नाला गेले होते. त्यांचा एक भाऊ रात्रपाळी करून पहाटे दोनच्या दरम्यान आपल्या फ्लॅटवर गेला होता. त्यावेळी सुद्धा तळमजल्यावरील ह्या फ्लॅटमध्ये चोरी झाली नव्हती. याचाच अर्थ घरातील माणसे किती वाजता बाहेर जातात व किती वाजता आत येतात याचा चांगला अभ्यास चोरट्यानी केला होता. या चोरीत सुद्धा त्यांनी एक भाऊ कामावरून घरी आल्यानंतरच चोरीचा प्रयत्न केला. रात्री दोनच्या नंतर चोरट्यानी बाहेरची कडी तोडून आत प्रवेश केला व घरात असलेले सुमारे पंधरा लाखाचे दागिने घेऊन पोबारा केला. चोरी झाली त्यावेळी घरात नक्की किती दागिने होते हे श्रीधर कुलकर्णी हे फोंड्यात आल्यावरच कळेल. चोरीची माहिती कळताच ते हुबळी येथून यायला निघाले असून ते आल्यानंतरच नेमके किती दागिने होते व घरात किती रोख होती याचा उलगडा होईल.
ह्याच रात्री दुसरी चोरी त्यांनी जवळच केली. श्रीधर कुलकर्णी यांच्या फ्लॅट पासून जवळच असलेल्या एका बैठ्या खोलीत चोरांनी दरोडा घातला. सदर चोरी झाली त्यावेळी घरातील कुटुंब बाजूच्या खोलीत झोपले होते. घरात चोरी झालेला इमरान याचे काही महिन्यापूर्वीच लग्न झाल्याने ते दागिने घरातच होते. इथे सुमारे अडीज लाखाच्या दागिन्यावर डल्ला मारला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर चोरीची माहिती पोलिसांना मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेच्या माध्यमातून धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. ठसे तज्ञांना सुद्धा पाचरण करण्यात आले होते.
दरम्यान मागच्या बारा दिवसात झालेला हा चौथा दरोडा असून, गस्त घालताना पोलिसांनी आपली कार्यपद्धती बदलावी अशी मागणी आता नागरीक करू लागले आहेत .