पणजी : मुंबईतील दसरा मेळाव्याबाबत हायकोर्टाने दिलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला जातोय, असे महाराष्ट्राचे शिक्षण तथा पर्यावरणमंत्री दीपक केसरकर येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
केसरकर म्हणाले की, 'हा निकाल म्हणजे शिवसेना कोणाची हे भासवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय असा चुकीचा अर्थ यातून काढण्यात येत आहे. जे या गोष्टीचे भांडवल करीत आहे. त्यांनी एक लक्षात ठेवावे की, बाळासाहेबांचे विचार आहे तेथेच लोक येतात आणि मुंबईत बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा भरवतील तेव्हा तेथे याचा प्रत्यय येईल.'
केसरकर म्हणाले की, 'शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. असे असताना दसरा मेळाव्याबाबतच्या हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊन चुकीची माहिती पसरविली जात आहे. आम्ही दसरा मेळावा घेणार असलेले बीकेसी मैदान दादर येथील शिवाजी पार्कपेक्षा तीन पटींनी मोठे आहे. हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्ट आव्हान द्यावे की नाही, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.'