लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कळंगुटचेच भाग बनलेल्या माझ्या कळंगुट पोलिसांनी ड्युटी करता करता अनेकवेळा पती पत्नीमधील वादही सोडवून त्यांचे संसार सावरण्याचे काम केलेले आहे, असे गौरवोद्गार कळंगुटचे पोलीस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी 'लोकमत'शी वार्तालाप करताना काढले.
पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक हे पोलिस स्थानकाची शक्तीस्थाने असतात. त्यांच्याच जिवावर कायदा व सुव्यवस्था ही राखली जाते. कळंगुट पोलिस स्थानकात एक चांगले वातावरण निर्मिती करण्याचे काम ८ महिन्यांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश मिळताना दिसत आहे, असे ते म्हणाले. कॉन्स्टेबलपासून सर्वजण आपले योगदान देत असतात. रात्री-अपरात्री केव्हाही ते तत्पर असतात. प्रसंगी वैयक्तिक कौटुंबिक सोहळे यांना ते मुकतात. यालाच पोलिसांचे जीवन असे म्हणतात याची त्यांना जाणीव आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
लोकांना पोलीस स्थानकात आपली तक्रार घेऊन येण्यासाठी विश्वास वाटला पाहिजे, अशा वातावरणाची निर्मिती करण्यात यश मिळाल्याचे ते सांगतात. पर्यटक आणि स्थानिक यात होणारे वाढत्या वादांविषयी विचारले असता ते म्हणाले की त्यात कधी पर्यटकांची चूक असते तर कधी स्थानिकांचीही असते. 'अतिथी: देवो भव:' ही आमची संस्कृती असली तरी सर्वच अतिथी हे देव मानण्याच्या लायकीचे असत नाहीत, असेही आढळून आले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कठोर व्हावेच लागते, असेही त्यांनी सांगितले. पोलिस यासाठी नेहमीच सज्ज असतात. त्यांना सामाजिक जबाबदारीही असते. असे दत्तगुरू सावंत यांन सांगितले.
चांगले काम केल्यास झोप लागतेच
रात्री चांगली झोप लागेल, असे काम दिवसा करावे म्हणजे काहीच समस्या होत नाहीत. आमिषे, आकर्षणे या गोष्टी प्रत्येक क्षेत्रात असतात, पोलीस सेवेत हे अधिक आहे. परंतु स्वतः किमान काही गोष्टी ठरवायच्या असतात आणि त्यांचे पालन करायचे असते. मग काहीच अडचणी येत नाहीत, असे त्यांनी सांगितले.
आणखी मनुष्यबळ हवे
सावंत म्हणाले की, कळंगुट स्थानकात सध्या ९० पोलीस कर्मचारी आहेत. परंतु हे मनुष्यबळ अपुरे पडते. २०१४ साली हा कर्मचारी वर्ग मंजूर झाला होता. त्यानंतर कळंगुटची लोकसंख्या वाढली. पर्यटकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"