लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : तिशे-बोरी येथे श्री विठोबा मंदिराशेजारी असलेल्या तलावाजवळील झाडीत मंगळवारी सकाळी मृत अवस्थेत बिबट्या आढळला. बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. फोंडा वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवचिकित्सेसाठी पाठवला आहे.
पॅपाळ तिशे येथील भागात तलावाचे पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी अनेक वन्य प्राणी येतात. हा बिबट्याही या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आला असावा. त्यावेळी दोन बिबट्यांमध्ये भांडण झाल्यामुळे यात एकाचा मृत्यू झाल्याचा संशय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
काही दिवसांपूर्वी बोरी येथील शिशिर लक्ष्मण जोशी यांच्या शेतात एक बिबट्या व तीन पिल्ले दिसून आले होते. त्यावेळी वन खात्याने बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा बिबट्या वनखात्याच्या हाती लागला नव्हता. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी शिरशिरे बोरी येथे काजू बागायतीमध्ये बिबट्या लोकांच्या नजरेस पडला होता.
सापडलेल्या मृत बिबट्याला वनखात्याने नेले असून त्याची शवचिकित्सा केल्यानंतर मृत्यूचे गुपित उलगडेल. या भागात काही लोक वनप्राण्यांची शिकार करत असल्याचाही संशय काही जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे.