पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारातून बरे होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा ताबा एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपविला जावा अशी मागणी मगो पक्षाने बुधवारी नव्याने करून भाजपासमोर पेच निर्माण केला आहे. प्रशासन ठप्प झाले असून ही स्थिती अशीच राहिली तर येत्या महिन्यानंतर मगोपला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही मगोपाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी दिला.ढवळीकर म्हणाले, की प्रशासनावर एवढा परिणाम झालाय, की लोक आता संतापू लागले आहेत. खनिज खाणी सुद्धा सुरू होत नाहीत. केंद्रीय खनिज कायदा दुरुस्त केला जात नाही, अध्यादेशही जारी केला जात नाही. दोन महिन्यांत थोडय़ा तरी खाणी सरकारने सुरू कराव्यात, म्हणजे लोकांना दिलासा मिळेल. स्थिती जर अशीच राहिली तर आम्हाला जनतेच्या हिताच्यादृष्टीने स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. मग निर्माण होणा-या परिणामांना आम्ही जबाबदार नसू.मंत्रिमंडळातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याकडे प्रशासनाची धुरा सोपवावी. उपमुख्यमंत्री नेमून किंवा अन्य प्रकारे ही धुरा सोपविता येते. सध्याची अधांतरी स्थिती व ठप्प कारभार हे कुणालाच परवडणारे नाही. लोक आम्हाला प्रश्न विचारतात. मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदीच रहावे पण सुत्रे दुस-याकडे द्यावीत, जेणेकरून प्रशासन चालेल,असे ढवळीकर म्हणाले. तसेच, शिरोडा व मांद्रे या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका मगो पक्ष लढवील, असे ढवळीकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नादाखल सांगितले.
मगोपशी बोलू - विनय तेंडुलकरभाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पत्रकारांना सांगितले, की मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे. ते येत्या महिन्यात त्यांच्या कार्यालयाचा ताबा घेतील. प्रशासनावर थोडा परिणाम आहे. ढवळीकर किंवा मगोपशी आम्ही चर्चा करू. प्रशासनाविषयीची त्यांची समस्या जाणून घेऊ.शिरोडा व मांद्रे मतदारसंघातील पोटनिवडणूक मगोपने लढवू नये असा मुद्दा आम्ही मगोपला पटवून देऊ. भाजपच्या पदाधिका:यांची बुधवारी बैठक झाली व संघटनात्मक कामावर चर्चा झाली व पोटनिवडणूक जिंकण्याविषयीही चर्चा झाली.