पणजी : गोव्यात लोकसभेच्या दोन जागांसाठी होत असलेली निवडणूक आणि विधानसभेच्या तीन जागांसाठी होत असलेली पोटनिवडणूक या दोन्हीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत शुक्रवारी (5 एप्रिल) संपुष्टात येणार आहे. बहुतेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत.
काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपामध्ये आलेले माजी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री गोविंद गावडे व मंत्री दिपक प्रभू पाऊसकर हे शिरोडकर यांच्यासोबत उपस्थित राहिले होते. शिरोडकर हे शिरोडा मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात एकूण 28 हजार मतदार आहेत. मगोपचे दिपक ढवळीकर आणि काँग्रेसचे महादेव नाईक याच मतदारसंघातून शिरोडकर यांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे शिरोडामध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. या शिवाय गोवा सुरक्षा मंचाचे संतोष सतरकर हेही उमेदवार आहेत.
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे श्रीपाद नाईक आणि काँग्रेसतर्फे गिरीश चोडणकर हे लढत आहेत. या दोघांमध्ये थेट लढत होईल असे मानले जाते. आम आदमी पक्षाचे प्रदीप पाडगावकर हेही या मतदारसंघातून प्रथमच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. मगो पक्ष आणि गोवा सुरक्षा मंच यांनी लोकसभा निवडणुका लढवायच्या नाहीत असा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी कुठल्याच दुसऱ्या पक्षाला अजून पाठींबा दिलेला नाही. लोकसभा मतदारसंघात अॅड. नरेंद्र सावईकर हे भाजपातर्फे लढत आहेत. तिथे सावईकर विरुद्ध काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांच्यातच खरी लढत आहे. आम आदमी पक्षाचे एल्वीस गोम्स हेही दक्षिणेतून लढत आहेत. दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या जास्त आहे. सांगे, केपे, फोंडा, काणकोण या चार तालुक्यांत हिंदू मतदारांची संख्या जास्त आहे.
गोव्यात येत्या 23 रोजी निवडणुका होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शिरोडा आणि म्हापसा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे दक्षिण आणि उत्तर गोव्यात दोन वेगळ्या जाहीर सभा घेतील. गडकरी आणि स्मृती इराणी याही प्रचारात उतरणार आहेत या सभांच्या तारखा मात्र निश्चित व्हायच्या आहेत. लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून भाजपातर्फे श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. विधानसभा पोटनिवडणुकांसाठी पक्षातर्फे म्हापशातून जोशुआ डिसूजा तर मांद्रेतून दयानंद सोपटे यांनी उमेदवारी अर्ज भरला. सोपटे यांच्यासोबत अर्ज भरताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही उपस्थित होते.