गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 05:50 PM2019-07-13T17:50:47+5:302019-07-13T17:59:57+5:30
गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.
पणजी - गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या तिन्ही आमदारांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाजवळ आयोजित निषेध सभेत बोलताना पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी ही घोषणा केली.
एका बाजूने नवीन आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन राजभवनावर त्यांचा शपथविधी व्हायला अर्धा तास असताना सरदेसाई यांच्याकडून सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आल्याची घोषणा केली. तसे पत्रही ते राज्यपालांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याचे दु:ख नाही, परंतु भाजपाने विश्वासाला तडा दिल्यामुळे वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या १३ जागा मिळाल्या असताना या पक्षाचे सरकार स्थापन करण्यास गोवा फॉरवर्डने भक्कम पाठिंबा दिला. मनोहर पर्रीकर हे एकमेव नेते मुख्यमंत्री म्हणून पात्र होते आणि त्यांना गोवा फॉरवर्डने शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन दिले होते. हे वचन पक्षाने शेवटपर्यंत पाळले. पर्रीकर यांच्या आजारपणाच्या काळात काही भाजपा आमदार काँग्रेसमध्ये उडी घेऊन काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या हालचालीत होते, परंतु गोवा फॉरवर्डने आणि अपक्ष असलेले रोहन खंवटे यांनी हे होवू दिले नाही. चौघेही सरकारच्या पाठिमागे खंबीरपणे राहिले. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपाने पर्रीकर यांची तत्वे पायदळी तुडविली असे सरदेसाई म्हणाले. पर्रीकर यांचे शारिरीक दृष्ट्या मृत्यू पूर्वी झाला होता परंतु त्यांचा राजकीय मृत्यू आता झाला आहे आणि तो त्याच्या पक्षातील नेत्यांनी केला आहे असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ज्यावेळी भाजपा आमदार भाजपाचे सरकार पाडू पाहत होते. त्यावेळी गोवा फॉरवर्ड व ते स्वत: खंबीर राहिल्याचे ते म्हणाले. सध्या अत्यंत घृणास्पद राजकारण चालविले जात आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या व त्यांच्या नेत्यांच्या डोक्यात काय चालले आहे ते काही कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. कधाचित या दलदलीतून त्यांनी बाहेर पडावे असे देवालाच वाटले असावे. सरकारात असताना एनडीएचा भाग बनून प्रामाणिकपणे काम केल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पर्वरी मतदारसंघात भाजपाला ३९९६ मतांची आघाडी मिळवून दिली होती व भाजपाला स्वत:च्या कळंगूट मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती याचा उल्लेखही त्यांनी केला. पणजीची जागा बाबूश मोंसेरात यांना पूर्वीच भेट दिली होती हा संशय आता बळावत असलयाचे त्यांनी सांगितले. इतर दोन पदच्चूत मंत्री जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर यावेळी टीका केली.