मडगाव: सहा महिन्यांच्या बंदीनंतर कारवारच्या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर साहसी पर्यटनाला सुरुवात झाली खरी, पण या पहिल्याच दिवशी अपशकून झाला. या समुद्र किनाऱ्यावर आपल्या पत्नी आणि मुलांसह सहलीसाठी आलेल्या वसंत मधुसूदन रेड्डी हा 55 वर्षीय नौदलाचा कॅप्टन पॅरामोटरिंग करताना सुमारे 50 मीटर उंचावरून पाण्यात कोसळल्याने त्याचे अपघाती निधन झाले.
या दुर्घटनेचे समाज माध्यमावर तीव्र प्रतिसाद उमटले असून, अशा पर्यटनाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले आहे. कारवार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅ. रेड्डी हे सी बर्ड नौदल तळावर काम करत होते. ते मूळ बंगळुरू येथील असून, त्यांची पत्नी व मुले गावाहून कारवारला आल्याने शुक्रवारी असलेली सुट्टी साजरी करण्यासाठी ते कारवार समुद्र किनाऱ्यावर आले होते.
लॉकडाऊन 5 खुले झाल्यानंतर शुक्रवारीच या किनाऱ्यावरील साहसी पर्यटन सुरू झाले होते. या किनाऱ्यावर चालू झालेल्या पॅरा मोटरिंगचा आनंद घेण्यासाठी घेण्यासाठी कॅ. रेड्डी यांनी चालकाबरोबर आकाशात झेप घेतली असता, वर मोटर बंद पडल्याने सुमारे 50 मीटर उंचीवरून ते पाण्यात कोसळले. त्यांना लगेच काठावर आणले गेले मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.
शुक्रवारी गांधी जयंतीची सुट्टी असल्याने कारवार समुद्रावर पर्यटकांची गर्दी होती. त्या गर्दीदेखत हा अपघात घडला. हे उड्डाण करताना सुरक्षेचे कोणतेही उपाय न घेतल्याने हे जीवघेणे साहसी प्रकार बंद करावेत, अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.