फोंडा - रान डुक्कर किंवा इतर रानटी सावजाना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना घडली असून, सापळा नक्की कुठल्या जनावराकरता लावला होता हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ज्या अवस्थेत बिबट्याचा मृत्यू झाला ते चित्र पाहून प्राणी मित्रानी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, संबंधिताना पकडण्यासाठी वन खात्याने मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तानुसार दयानंदनगर - धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याच्या मागे असलेल्या सुरंगी फार्म परिसरात दोन किंवा तीन दिवसापूर्वी सदर बिबट्या फासात आढळून जखमी आल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तिथे काम करणाऱ्या काही कामगारांना जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आला. यासंबधीची माहिती लगेचच वन खात्याला देण्यात आली. माहिती मिळताच कुळे वन विभागाचे अधिकारी रवी शिरोडकर यांनी त्वरित इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी जखमी बिबट्या गंभीर अवस्थेत जिवंत होता. स्टील नायलोंनच्या दोऱ्या व लोखंडी खांब वापरून जो सापळा बनवण्यात आला होता तो बिबट्याच्या कमरेच्या भागात रूतून बसल्याने तो त्या सापळ्यात अडकून पडला होता. मागचे तीन दिवस त्या बिबट्याने आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड केली असणार. मुळात ज्यावेळी जनावरे वाचण्यासाठी हिसके देतात त्यावेळी सापळ्याची दोरी जास्त आवळली जाते व बिबट्या आणखीन जखमी होतो. इथे सुद्धा तेच घडले.
जखमी अवस्थेतसुद्धा बिबट्या उग्र झालेला असल्याने ह्या संदर्भातले तज्ज्ञ परेश परब यांना बिबट्याची स्थिती पाहण्यासाठी पाचारण करण्यात आले. परंतु परेश परब घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच संध्याकाळी सहाच्या दरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला. मृत झालेल्या बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला फासा दिसून आला. बिबट्याच्या पाहणी वरून दोन किंवा तीन दिवसापूर्वी बिबट्या फासात अडकून जखमी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
परेश परब यांनी अधिक माहिती देताना म्हणाले की मृत झालेला बिबट्या फासात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यासंबधी सखोल चौकशी करण्यात येणार आहे. मृत आलेल्या बिबट्याच्या कमरेला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात रान डुक्कर येत असल्याने अज्ञातांनी डुक्करच्या शिकारी साठी किंवा अन्य रानटी जनावरासाठी लावलेल्या फासात बिबट्या अडकून मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिबटा तीन दिवसांपूर्वी फासात अडकल्याचा संशय व्यक्त होत असताना ह्या तीन दिवसात तो ओरडला असणार त्याची डरकाळी कोणाच्या कानावर कशी गेली नाही हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला आहे.