वास्को: ३६ वर्षीय आंतोन कुजनेत्सोव हा रशियन राष्ट्रीय पर्यटक गुरूवारी (दि.१३) गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून पत्नीसहीत रशियाला जाण्यासाठी आला असता अचानक त्याच्या प्रकृतीत बिघाड होऊन तो मरण पोचला. विमानतळावर पोचल्यानंतर आंतोन यांनी छातीत दुखत असल्याचे कळविल्यानंतर त्वरित त्याला जवळच्या इस्पितळात नेण्यात आले, मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला.
दाबोळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरुवारी सकाळी ही घटना घडली. आंतोन आपल्या पत्नीसहीत आठ दिवसापूर्वी (दि.४) रशियाहून गोव्यात आला होता. त्यांनी काणकोेण भागातील एका हॉटेलात वास्तव्य केले असून गुरूवारी ते पुन्हा रशियाला जाण्यासाठी विमानतळावर पोचले.
विमानतळावर पोचल्यानंतर त्याच्या प्रकृतीत बिघाड होत असल्याचे कळताच त्याला खासगी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ३६ वर्षीय आंतोन च्या मृत्यूचे नामके कारण काय याचा खुलासा झालेला नसल्याची माहीती निरीक्षक नार्वेकर यांनी देऊन शुक्रवारी (दि.१४) त्याच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतरच कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगितले. मृत्यूचे कारण शवचिकित्सेनंतर स्पष्ट होणार असले तरी हृदय विकाराच्या झटक्याने आंतोनचा मृत्यू झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला.