पणजी : महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व दुकानदार, लहान मोठे व्यावसायिक यांच्याकडून सोपो वसूल करण्यासाठी निविदा काढण्याचा निर्णय महानगरपालिकेतर्फे घेण्यात आला आहे. तसेच पे पार्किंग बाबतच्या निविदा यापूर्वीच काढल्या असून येत्या दोन दिवसात सदर निविदा उघड होणार असल्याचे मनपातर्फे सर्व नगरसेवकांना कळविण्यात आले आहे.
बुधवारी पणजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी महपौर रोहित मोन्सेरात, उपमाहपौर संजीव नाईक, व इतर नगरसेवक उपस्थित होते.
सोपो वसुलीत मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो, हे नगरसेवकानी लक्षात आणून दिल्यानंतर, सोपो अकरण्यात कुठलीही अनियमितता नको तसेच वेळेत सोपो आकारण्यात यावे यासाठी निविदा काढून कंत्राट देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. तसेच सोपो दरात वाढ झाली असून सोपो दर २० रुपयांवरून जीएसटी लावून २५ रुपये करण्यात आले आहे. तसेच जुवारकर यांचे पे पार्किंग कंत्राट बेकायदेशररित्या वाढविण्यात आल्याबाबत विरोधाचे सुर पालिकेत ऐकू येत होते, या अनुषंगाने मनपातर्फे यापूर्वीच निविदा काढण्यात आल्या होत्या, त्या निविदा शुक्रवारपर्यंत उघडण्यात येईल. पणजीतील १४ ठिकाणावरून पे पार्किंग फी आकारण्यात येईल, तसेच आतापासून रविवारी देखील पे पार्किंग फी घेण्यात येईल, यावर सर्व नगरसेवकांनी सहमती दाखवली आहे.
या दोन महत्वाच्या निर्णयानंतर इतर लहान मोठे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दीवजा सर्कलकडे गोवा कचरा व्यवस्थापन परिषदला तात्पुरती कचरा साठविण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यास, आणि त्यांना वीज जोडणीस ना हरकत दाखला देणे, शेड गार्डन विकसित करणे, प्रभगांचा विकास यांचा समावेश आहे.
स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खास बैठक -नगरसेवक उदय मडकईकर यांनी पणजीतील स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या बेशिस्त कामाचा विषय मांडला. स्मार्ट सिटीच्या कामामुळे गेले एक वर्ष पणजीवासियानी त्रास सहन केले, परंतु काम झाल्यानंतर देखील त्यांना पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाचा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. कामाचे नियोजन करण्यासाठी सल्लागार कंपनीने ८ कोटी रुपये घेतले, परंतु कामाचे योग्य नियोजन कुठेच दिसले नाही, असा मुद्दा मडकईकर यांनी मांडला. तसेच सल्लागार कंपनीची मनपासोबत बैठक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला प्रत्युत्तर म्हणून अधिवेशन नंतर लगेचच ही बैठक घेण्याचे आश्वासन महापौर यांनी यावेळी दिले.