लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त बनवण्याचे ध्येय आहे. त्यादिशेने सरकार पावले उचलत असून, अक्षय ऊर्जेला चालना देत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गोवा सरकाने इंडियन ऑइलसोबत सामंजस्य करार केला आहे. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर, इंडियन ऑइलचे अधिकारी एस. एम. वैद्य, गेडाचे संचालक स्टीफन फर्नांडिस, सुजॉय चौधरी, शंतनू गुप्ता, गोवा सरकारचे अधिकारी संजीत रॉड्रिग्स उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कार्बनमुक्त देश करण्याचे केंद्राने २०५० हे उद्दिष्ट ठेवले आहे. गोवा सरकारने मात्र ते दहा वर्षांनी कमी करून २०४० हे ठरवले आहे. त्यानुसार राज्यात अक्षय ऊर्जा अर्थात सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यावर भर आहे. घरावर तसेच आपल्या इमारतीवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी सरकार ५० टक्के अनुदान देत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कार्बनमुक्त राज्याचे ध्येय साधण्यासाठी लोकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कराराचा लाभ...
इंडियन ऑइलसोबत केलेल्या करारानुसार त्यांच्या प्रत्येक पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, प्लास्टिकपासून टिकाऊ साहित्य तयार करणे, वातावरणातील कार्बनची पातळी घटवण्यासाठी १० हजार झाडांची लागवड करणे, आदींचा यात समावेश असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.