आमदार अपात्रता याचिकांवर निर्णय घ्या; अमित पाटकर यांचे सभापतींना स्मरणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 10:44 AM2024-05-14T10:44:33+5:302024-05-14T10:46:01+5:30
सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसचे आमदार फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपामध्ये विलीन केला.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'त्या' आठ फुटीर आमदारांविरुद्धच्या प्रलंबित अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापतींना स्मरणपत्र पाठवले आहे. सभापतींनी त्यांच्यासमोर प्रलंबित असलेल्या याचिकेवर निर्णय घेण्यास विलंब केल्यास मी इतर सर्व कायदेशीर पर्याय शोधून काढेन, असे पाटकर यांनी म्हटले आहे.
सप्टेंबर २०२२ मध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस, डिलायला लोबो, राजेश फळदेसाई आणि केदार नाईक हे काँग्रेसचे आमदार फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपामध्ये विलीन केला.
१४ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या आठ आमदारांविरुद्ध पाटकर यांनी ६ डिसेंबर २०२२ रोजी अपात्रता याचिका दाखल केली. या प्रलंबित अपात्रतेच्या याचिकेकडे मी तुमचे लक्ष वेधून घेतो आणि तुम्ही त्यावर कालबद्ध पद्धतीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करतो, असे पाटकर यांनी पत्रात म्हटले आहे. वरील ८ आमदारांनी पक्षांतर करून भारतीय राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाचे उल्लंघन केल्याचा पाटकर यांचा दावा आहे. १७ महिन्यांपासून सभापतींसमोर अपात्रता याचिका प्रलंबित आहे.
आता निवाडा द्याच...
दरम्यान, पाटकर यांनी प्रत्यक्ष फुटीच्या पूर्वी जुलै २०२२ मध्ये दिगंबर कामत व मायकल लोबो यांनी इतरांसोबत काँग्रेसमधून फुटण्याच्या हालचाली केल्या तेव्हा या दोघांविरुध्द सादर केलेली अपात्रता याचिका सभापतींनी गेल्या आठवड्यातच फेटाळून लावली. फुटीनंतरच्या आपल्या याचिकेवरही सभापतींनी आता निवाडा द्यावा, असे पाटकर यांनी म्हटले आहे.