पणजी : येत्या दि. 11 पासून दिल्लीत होणा-या गोव्यातील खाण अवलंबितांच्या आंदोलनात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सहभागी व्हावे असा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी बैठकीनंतर ही माहिती येथे दिली. आपल्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार, दिगंबर कामत वगैरे धरणो आंदोलनात सहभागी होतील. आम्ही खाण अवलंबितांना कायम पाठींबा दिला असून खनिज खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात म्हणून गोवा सरकारने डोळे उघडावे अशी मागणी आम्ही सातत्याने केली व पणजीसह अन्यत्र झालेल्या खाण अवलंबितांच्या आंदोलनातही काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते कायम सहभागी झाले. दिल्लीतील आंदोलनात आम्ही सहभागी होऊच, शिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेण्याच आम्ही प्रयत्न करू, असे कवळेकर यांनी सांगितले.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसचे चौदापैकी बारा आमदार सहभागी झाले. लुईङिान फालेरो गोव्याबाहेर असल्याने बैठकीला येऊ शकले नाहीत. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचे किमान चार नेते तरी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होतील. केंद्र सरकारला गोव्याच्या हिताशी काहीच देणोघेणो राहिलेले नाही. खाणी सुरू होण्यासाठी केंद्राने पाऊलेच उचलली नाहीत,असे कवळेकर म्हणाले. काँग्रेस
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर प्रदेश काँग्रेस समितीचीही बैठक झाली. शिरोडा व मांद्रेमध्ये प्रबळ काँग्रेस उमेदवार उभे करावेत व लोकसभा निवडणुकीवेळीही काँग्रेसने भाजपला टक्कर देण्यासाठी व्यवस्थित रणनीती आखावी या दृष्टीकोनातून बैठकीत चर्चा झाली. दि. 5 जानेवारीपासून काँग्रेस पक्ष जनसंपर्क अभियान राबवणार आहे. काँग्रेस कार्यकर्ते या अभियानावेळी लोकांच्या घरी भेट देतील व केंद्रातील व गोव्यातील भाजप सरकारचे अपयश लोकांसमोर मांडतील. तसेच पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांर्पयतचे डोनेशन कुपन लोकांना देऊन काँग्रेस पक्षाच्या कामात लोकांना सहभागी करून घेतले जाईल, असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. त्यावेळीच नवी सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली जाईल, असे चोडणकर म्हणाले.