पणजी : शेजारी सिंधुदुर्ग, कारवारमधून लहान मासळी व्यावसायिकांना गोव्यात विक्रीसाठी मासळी आणता यावी याबाबत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करीत आहे. छोट्या होड्यांद्वारे मासेमारी करणा-या आणि तासाभरात गोव्यात पोचणा-या या मासे विक्रेत्यांना कोणत्या पद्धतीने दिलासा देता येईल यावर आज बैठकीत निर्णय होणार आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, ‘ या लहान मच्छिमारांना सवलत दिल्यास त्याचा गैरफायदा मोठ्या मासळी व्यापा-यांनी घेऊ नये हे सरकारचे म्हणणे आहे. अजूनही काही घाऊक विक्रेते एफडीएचे नियम पाळत नाहीत. त्यांच्याकडे योग्य ती बिलेही नसतात. अशा लोकांवर कारवाई केली जाईल. मासळी निर्यातदारांची वाहने कोणीही अडविलेली नाहीत. रविवारी दहा वाहने मासळी घेऊन गोव्यातून रवाना झाल्याचे विश्वजित यांनी एका प्रश्नावर सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्ग, कारवार येथील मासळी व्यापाºयांसाठी आयात निर्बंध शिथिल केले जावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने मुभा द्यावी तसेच गेल्या १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलिन प्रकरणात ज्यांचा हात आहे त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी राज्य शिवसेनेने केली आहे. ‘सिंधुदुर्गातील छोट्या मत्स्य व्यवसायिकांना गोव्यात त्यांची मासळी आणता यावी याकरिता आयात निर्बंध शिथिल करावेत, अशी विनंती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधून केली आहे.
कर्नाटकचे मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी रविवारी सकाळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याशी संपर्क साधून कारवार, उडुपीमधील मासळी व्यापा-यांना गोव्यात मासळी निर्यातीलसाठी सवलत द्यावी, अशी मागणी केली.