लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यातील मराठी पत्रकारांना पुन्हा व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गोवा मराठी पत्रकार संघ पुनरुज्जीवित करण्याचा एकमुखी निर्णय मराठी पत्रकारांच्या बैठकीत घेण्यात आला. येथील गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात शनिवारी आजी माजी मराठी पत्रकारांच्या बैठकीत संघाचे पुनरूज्जीवन करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त झाले.
गोवा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार र. वि. प्रभूगावकर हे या बैठकीचे निमंत्रक होते आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. ज्येष्ठ पत्रकार आणि बैठकीचे सहनिमंत्रक वामन प्रभू यानी बैठक बोलावण्यामागील उद्देश स्पष्ट करताना ठप्प पडलेले संघाचे कार्य पुढे कसे नेता येईल यावर काही सूचना केल्या. अजित पैगीणकर, गंगाराम म्हांबरे, विठ्ठल पारवडकर, प्रकाश तळवणेकर आदि पत्रकारानीही यावेळी चर्चेत भाग घेऊन विधायक सूचना केल्या.
संघाच्या घटनेतील तरतुदीनुसारच पुढील पाऊल उचलण्याचे ठरले आणि संघाचे पुनरूज्जीवन करण्याची सूचना करणारा ठराव बैठकीत मतैक्याने मंजूर करण्यात आला. पुढील कार्यवाही करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जयंत संभाजी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची एक अस्थायी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत गुरुदास सावळ, वामन प्रभू, रमेश कोलवाळकर आणि सुभाष कृ. नाईक यांचा समावेश आहे. संघाच्या घटनेतील तरतुदीनुसार विशेष सभा बोलावून, निष्क्रिय असलेला संघ पुन्हा सक्रिय करण्याचे ठरविण्यात आले.