लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी राज्याचे मुख्य परिमल राय यांना सोमवारी पत्र लिहून रामनवमीनिमित्त राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे.
रामनवमी या महिन्याच्या ३० तारखेला होणार आहे, आणि हिंदूंचा प्रभू श्रीरामाबाबतचा आदर आणि भक्ती पाहता, रामनवमीच्या दिवशी सरकारने सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करावी. गेल्या सरकारांनी श्रीराम यांच्या जन्मदिवसाला योग्य तो आदर आणि महत्त्व दिलेले नाही. त्यामुळे ही चूक सुधारत आताच्या सरकारने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी पत्राद्वारे केली आहे.
भगवान राम आदर्श पुरुष आणि एक न्यायप्रिय शासक म्हणून ओळखले जातात. एखाद्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजेत आणि धर्माचे जीवन जगले पाहिजे, हा रामाच्या जीवनातील प्रतिकात्मकतेचा संदेश देणे आज अत्यंत आवश्यक ठरले आहे. समानता, निष्पक्षता आणि न्याय हे तत्त्व ज्याने त्याच्या राजवटीला दर्शविले होते, ते आजच्या राज्यकर्त्यांनी कायम राखावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. जनभावनेचा मान राखून रामनवमीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असेही सरदेसाई यांनी नमूद केले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"