गोव्यात सोशल मीडियावरुन भाजपाची बदनामी: भाजपयुवा मोर्चातर्फे स्थानिक काँग्रेस नेत्यावर पोलिसांत तक्रार
By सूरज.नाईकपवार | Published: November 22, 2023 05:33 PM2023-11-22T17:33:18+5:302023-11-22T17:35:06+5:30
मडगाव पोलिसांनी कुतिन्हो यांना आज दुपारी १२ वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स पाठविला होते. त्यानुसार ते पोलिस ठाण्यात हजरही राहिले.
मडगाव: सोशल मीडिया Whatsapp ग्रुपच्या माध्यमातूम भाजपाचे नाव बदमान केल्याचा दावा करुन गोवा राज्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे येथील स्थानिक काँग्रेसचे नेते साव्हियो कुतिन्हो यांच्या विरुद्ध मडगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याविषयी मडगाव पोलिसांनी कुतिन्हो यांना आज दुपारी १२ वाजता पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी समन्स पाठविला होते. त्यानुसार ते पोलिस ठाण्यात हजरही राहिले.
आपल्यावरील सर्व आरोपाचे कुतिन्हो यांनी खंडन केले आहे. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकात शुल्क आकारणीत जो घोटाळा झाला आहे तो आपण उघड केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घोटाळयाची सरकारने चौकशी करावी अथवा आम्ही योग्य त्या ठिकाणी त्यावर दाद मागू असेही ते म्हणाले.
कोकण रेल्वे स्थानकावर गाड्या प्रवेश करण्यासाठी असलेल्या टोल नाक्यावर भाजपचे काही पदाधिकारी स्टेशन कंपाउंडमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून "प्रवासी कर" म्हणून २० रुपये वसूल करत आहेत. असे यावेळी कुतिन्हो यांनी १७ नोव्हेंबर रोजी या ठिकाणी केलेल्या आंदोलनावेळी सांगितले होते.
२१ नोव्हेंबर रोजी साव्हियो कुतिन्हो यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसमवेत मडगाव रेल्वे स्थानकाच्या टोल बूथजवळ पुन्हा आंदोलन केले होते. आणि यावेळीही त्यांनी पैसे वसूल करण्यात भाजपच्या कार्यकर्त्याचा समावेश असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाचा मजकूर कुतिन्हो यांनी व्हॉट'सअँप ग्रुप मध्ये व्हायरल केला होता. या प्रकरणी भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष अभिषेक काकोडकर यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे.
साव्हियो कुतिन्हो यांनी या विषयावर स्पष्टीकरण देताना सांगितले की भाजपा पक्षाच्या नावाची बदनामी केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाने पोलीस तक्रार दाखल केली होती म्हणून मला मडगाव पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मला माहीत नाही की मी तिथे पक्षाचे नाव कसे बदनाम केले. भाजपा पक्षाचे एक पदाधिकारी सत्यविजय नाईक हे कोकण रेल्वे स्टेशनवर बेकायदेशीरपणे टोल वसूल करत होते. ही बाब कोकण रेल्वेच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांनी सत्यविजय नाईक यांच्या नावावर असलेले साहित्य आणि बार कोड आकारला आहे, तर कंत्राट एका उमिया एंटरप्राइझने घेतले आहे . मी सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी सत्यविजय नाईक यांच्याकडून लुटलेले पैसे परत मिळवून देणार आहे अन्यथा आम्ही पोलीस तक्रार दाखल करणार असे ते म्हणाले.