नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2024 11:06 AM2024-06-06T11:06:08+5:302024-06-06T11:07:41+5:30

ज्यांनी पक्षांतर करून भाजपला जवळ केले, त्या नेत्यांनाही मतदारांनी आपली जागा दाखवून दिली.

defection of the leaders did not interest them aggrieved voters avoided division in goa lok sabha election 2024 | नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

नेत्यांचे पक्षांतर रुचले नाही; सासष्टीत मतदारांनी टाळली विभागणी

सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सासष्टी तालुक्यातील आठही विधानसभा मतदारसंघात मतदारांना नेहमीच ख्रिस्ती चेहरा भावतो. तसेच जो येथील मतदारांच्या राज्यातील प्रश्नांवर नेहमी सातत्याने आवाज उठवितो, तो लोकांच्या पसंतीला ठरतो. कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे या दोन्ही अटींमध्ये चपखल बसत असल्याने तालुक्यात मतदारांनी त्यांना नाखूश न करतात भरभरून आपली मते त्यांच्या पारड्यात टाकली व त्यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजाविली. त्यामुळे सासष्टीत काँग्रेसने १ लाख ११ हजार ५८३ मते मिळविली, तर भाजपच्या पारड्यात केवळ ५१,०५८ मतेच पडली.

यंदा तालुक्यात याउलट भाजपची स्थिती होती. भाजपने पल्लवी धेपे यांच्यासारखा उद्योगपती घराण्यातील चेहरा दिला. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. तसेच, ज्यांनी पक्षांतर करून भाजपला जवळ केले, त्या नेत्यांनाही मतदारांनी आपली जागा दाखवून दिली.

सासष्टीत या खेपेला काँग्रेस पक्ष एकसंघ राहिला. इंडिया आघाडीमुळे त्यांना आप व गोवा फॉरवर्डची भक्कम साथ मिळाली. मतविभागणी टाळली गेली. पूर्वी समविचारी पक्षांचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे राहत होते, त्यावेळी तालुक्यात मतविभागणी व्हायची. हे यंदा टळल्याने काँग्रेसच्या पथ्यावर पडले.

मागील निवडणुकीत...

लोकसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत भाजपला मडगावमधून ९,०४६ मते मिळाली होती. यंदा तो आकडा ११,४७४ झाला. म्हणजेच गतवेळेपेक्षा २४२८ मतांची वाढ झाली. फातोर्डा मतदारसंघात गेल्यावेळी ९,०४६ मते मिळाली होती. यावेळेस ती ९८८१ एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली. नावेलीत गेल्यावेळी ६,७५४ मते मिळाली होती. यंदा ती ७१५१ झाली आहेत. तर नुवेत मागच्या खेपेला २,५२५ मते मिळाली होती. आता ती ३७८३ पर्यंत पोहोचली आहेत. कुंकळ्ळीत २०१९ मध्ये ७,४३९ मिळाली होती. यावेळी त्या मतांमध्ये घट होवून ती ६,५७२ वर आली आहेत.

जागरुक मतदार

तालुक्यातील मतदारांना आमदारांचे पक्षांतर रुचलेले नाही. आपण आमदारांना विकत घेतले, म्हणजे मतदारांनाही घेतले, असा कोणी गैरसमज करून घेऊ नये, हे सासष्टीकरांनी दाखवून दिले आहे. उमेदवार पल्लवी धेंपे यांचा चेहराही मतदारांना भावला नाही, असे राजकीय जाणकार प्रभाकर तिबलो सांगतात.

फातोर्डा, नावेलीत भाजपने टिकवली पारंपरिक मते

सासष्टी तालुक्यात भारतीय जनता पक्ष बनवान नव्हता. यंदा बदल घडवण्याच्या हेतूने लोकप्रतिनिधींची गोळाबेरीज पक्षाने केली. आमदार दिगंबर कामत हेही याखेपेला भाजपमध्ये आहेत; मात्र तेही काही राजकीय करिश्मा दाखवू शकले नाहीत. यंदाही फातोर्डा व नावेलीत भाजप लीड मिळवू शकले नाही. दोन्ही मतदारसंघात समाधानकारक बाब म्हणजे भाजप पारंपरिक मते टिकवली आहेत.

कामतांना पारंपरिक मतदारांची साथ नाही

मडगाव मतदारसंघात दिंगबर कामत यांच्यासारखा मोहरा असून, त्यांना येथून भाजपला जास्त मताधिक्य मिळवून देणे शक्य झाले नाही. याला अनेक कारणे आहेत. कामत यांनी जरी पक्षांतर केले, तरी येथील पारंपरिक काँग्रेसचा मतदार पक्षासोबतच राहिला. यात अल्पसंख्याकासह हिंदू धर्मियांचाही समावेश होता. पल्लवी धेंपे यांनी या मतदारसंघात पूर्वी कामही केले नव्हते. त्या नवख्या ठरल्या. कामत यांनी प्रचारात जोर लावला. मात्र प्रत्यक्षात त्यांना जे अल्पसंख्याक पूर्वी मतदान करीत होते, त्यांनी या खेपेस त्यांच्याकडे पाठ वळवली.

भाजपशी घरोबा अंगलट

नुवेत मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना तर तेथील मतदारांनी साफ धुडकावून लावले. जो उमेदवार काँग्रेस पक्षातून निवडून येऊन नंतर भाजपशी घरोबा करतो, त्यांना नुवेतील मतदारांनी यापूर्वीही झिडकारले आहे. यापूर्वी माजी आमदार विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान यांनी तसा अनुभव घेतला होता. या खेपेला तो सिक्वेरा यांना आला.
 

Web Title: defection of the leaders did not interest them aggrieved voters avoided division in goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.