पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात आगमन होणे लांबणीवर पडले आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री गोव्यात दाखल होतील, असे यापूर्वी सांगितले गेले, तरी मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री पर्रीकर हे येत्या जून महिन्याच्या दुस-या पंधरवड्यात गोव्यात येण्याची शक्यता आता शासकीय पातळीवरून व्यक्त होत आहे.
पर्रीकर हे तीन महिने अमेरिकेतील एका इस्पितळात उपचार घेत आहेत. जेव्हा उपचार सुरू नसतात तेव्हा ते इस्पितळाच्या परिसरातच एका अपार्टमेन्टमध्ये राहतात. कधी त्यांचा पुत्र तर कधी मुख्यमंत्र्यांच्या गोव्यातील कार्यालयातील अधिकारी तिथे भेट देऊन येत असतात. पर्रीकर यांना उपचारानिमित्ताने इस्पितळाच्या परिसरातच त्यांना रहावे लागते. मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेला जाताना गोव्यात प्रभारी मुख्यमंत्री नेमला नाही. मुख्यमंत्री पदाचा तात्पुरता ताबा त्यांनी कुठल्याच मंत्र्याकडे दिला नाही. तसा धोका त्यांनी राजकीयदृष्ट्या पत्करला नाही. पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार हे आघाडीचे सरकार आहे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि काही अपक्ष आमदार या सरकारचा भाग आहेत. या सर्वांना मान्य होईल असे नेतृत्व अस्तित्वात नसल्याने पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा ताबा कुणाकडेच दिला नाही, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. पर्रीकर यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली व या समितीला मर्यादित अधिकार देऊन आपल्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार पुढे नेण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली. या समितीमध्ये भाजपचे ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा, गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई आणि मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांचा समावेश आहे. गेले अडिच महिने मंत्रिमंडळाच्या बैठका झालेल्या नाहीत. काही प्रस्ताव मंत्र्यांसमोर फिरवून ते मंजुर करून घेतले जातात.
मुख्यमंत्री पर्रीकर हे दर महिन्याला तीन मंत्र्यांच्या समितीला मुदतवाढ देत आले आहेत. प्रथम एका महिन्यासाठीच ही समिती नेमली गेली होती. पर्रीकर हे उपचार पूर्ण करून मे महिन्याच्या अखेरीस गोव्यात परततील असे पूर्वी सांगितले गेले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे अलिकडेच गोव्यात असताना पर्रीकर यांनी अमेरिकेहून पाठविलेल्या व्हीडीओ संदेशातून र्पीकर यांनी आपण येत्या काही आठवडय़ांत गोव्यात परतेन असे म्हटले होते. पर्रीकर यांची प्रकृती आता ठीक आहे. तथापि, ते जूनच्या दुस-या आठवडय़ात गोव्यात दाखल होतील अशी माहिती मिळते. सरकारमधील काही मंत्र्यांनाही तशीच माहिती मिळाली आहे. काही मंत्री अमेरिकेतील इस्पितळाला भेट देऊन पर्रीकर यांची विचारपूस करू पाहत आहेत पण पर्रीकर यांनीच त्यांना तुम्ही सध्या येऊ नका असे कळविले असल्याचे दोघा मंत्र्यांनी सांगितले.