पणजी: राज्यात दि. २० ते २८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान होणाऱ्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. तसेच फिल्म बाझार या विभागासाठीही नोंदणी सुरू झाली आहे. प्रतिनिधींना सदर नोंदणी इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करता येईल.
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहाय्याने दरवर्षी एफ्फीचे आयोजन होत असते. प्रतिनिधी नोंदणीसाठी चित्रपट व्यावसायिक तसेच रसिकांसाठी १,१८० रुपये शुल्क असणार आहे. तर फिल्म बाझार विभागात नोंदणी करण्यास सुमारे १८ ते २१ हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना मात्र या महोत्सवात मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. यंदा पाच हजार पेक्षा जास्त प्रतिनिधी नोंदणी होणार असल्याची शक्यता आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा इफ्फीमध्ये इंडियन पॅनोरमा विभागात २६ फिचर आणि २१ नॉन फिचर चित्रपटांचा समावेश आहे. तसेच गोवा विभागासाठी प्रवेशिका खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणी आणि मराठी भाषेतील फीचर तसेच नॉन फीचर चित्रपट दाखवण्यात येतील. याबाबतचे अर्ज गोवा मनोरंजन संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर आहे. या विभागात चार होऊन जास्त प्रवेशिका आल्या तरच चित्रपट दाखवले जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा पणजी आणि पर्वरी येथील आयनॉक्स थेटर, गोवा मनोरंजन संस्थेचे मॅकनिझ पॅलेस आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयम या ठिकाणांचा वापर इफ्फीसाठी केला जातो. तसेच यंदा मडगाव येथील रवींद्र भवनात देखील काही निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच गावागावांमध्ये इफ्फी पोहचविण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवित असते.