पणजी : हिजाबला आक्षेप घेतल्याने नेट परीक्षेला मुकलेल्या गोव्यातील महिलेचे प्रकरण गाजत असतानाच दिल्लीतही अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले असून त्या प्रकरणात दिल्ली अल्पसंख्याक आयोगाने विद्यापीठ अनुदान आयोगाला नोटिसही बजावली आहे.दिल्लीत उमिया खान या जामिया मिल्लीया इस्लाम विद्यार्थिनीच्या बाबतीतही असाच प्रकार घडलेला आहे. यूजीसीला ही नोटिस बजावताना आयोगाने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला दिला आहे. मुस्लिम महिला हिजाब परिधान करुन परीक्षा देऊ शकतात, असा आदेश कोर्टाने याआधी दिलेला आहे याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.गोव्यात सफिना खान सौदागर (२४) या महिलेला गेल्या १८ रोजी झालेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेला (नेट) तिने डोक्यावरील हिजाब हटविण्यास नकार दिल्याने परीक्षेला बसू दिले नाही. तिने या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग तसेच राज्य महिला आयोगाकडे अधिकृत तक्रार केली आहे. तक्रारीत ते म्हणते की, आपले वैयक्तिक स्वातंत्र्य आणि हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही, असा दावा तिने केला आहे. त्या म्हणतात की, घटनेच्या कलम २५ ते २८ ने धार्मिक रितीरिवाज पाळण्याचे आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आपण परिधान केलेल्या हिजाबला आक्षेप घेणे हा निव्वळ अत्याचार ठरतो.नेटच्या संकेतस्थळावर कोणता वेष परिधान करावा याबाबत कोणतेही नियम नव्हते. शिवाय परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जावर लावलेला आपला फोटोही हिजाबमध्येच होता. आपला अर्ज स्वीकारण्यात आला त्यामुळे परीक्षा केंद्रावर हिजाबला आक्षेप घेण्याचे कारण नव्हते, असे तिचे म्हणणे आहे. हे प्रकरण सध्या गाजत असतानाच दिल्लीतही असेच प्रकरण घडल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
गोव्याप्रमाणेच दिल्लीतही हिजाब प्रकरण, दिल्ली अल्पसंख्याक आयोगाची यूजीसीला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 7:55 PM