पणजी: २३२०४ कोटी रुपयांची जीएसटी थकबाकीसाठी जीएसटी संचालनालयाकडून नोटीस बजावण्यात आलेल्या गोव्यातील सर्वात मोठी गेमिंग कंपनी असलेल्या डेल्टा कॉर्पकडून धारगळ येथील ३ हजार कोटी रुपयांचा प्रस्तावित मेगा रिसॉर्ट वजा गेमिंग प्रकल्प गुंडळण्याची तयारी सुरू आहे. हा प्रकल्प ४५७३ नोकऱ्या निर्माण करणारा प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत होते. तूर्त कंपनीने धारगळमधील हा प्रस्तावित प्रकल्प पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे. कंपनी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत असल्याचीही सबब पुढे करण्यात आली आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी धारगळचा प्रकल्प गुंडाळण्याच्या तयारीत आहे.
या जमिनीत रोजगार निर्माण करणारे मोठे प्रकल्प येणार असल्याचे सरकारने म्हटले होते. तसेच गोवा गुंतवणूक व प्रोत्साहन मंडळानेही ही जमीन गुंतवणुकीची जमीन म्हणून अधिसूचित केली होती. राज्य सरकारने ५० हजार नोकऱ्यांची निर्मिती करणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यासाठीही या जमिनीवरील गुंतवणूक सरकारसाठीही महत्त्वपूर्ण होती. यापूर्वी या प्रकल्पाविषयी कंपनीने खूप काही सांगितले होते. या प्रकल्पात तीन हॉटेल्स, कन्व्हेन्शन सेंटर, एक मल्टिप्लेक्स सिनेमागृह, इलेक्ट्रॉनिक सीटी, वॉटरपार्क, बँक्वेट सुविधा आणि मनोरंजन सुविधा निर्माण केल्या जातील असेही म्हटले होते. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ३० नोव्हेंबर रोजी झाली होती, या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
डेल्टा कॉर्प राज्यात पाच कॅसिनो आहेत. त्यातील डेल्टिन जॅक, डेल्टिन रॉयल आणि किंग्स कॅसिनो फ्लोटेल हे फ्लोटींग कॅसिनो तर डेल्टिन सूट, नेरुळ आणि डेल्टिन झुरी हे दोन जमिनीवरील कॅसिनो आहेत. बंगळूर्या जीएसटी इंटेलिजन्स संचालनालयाने कंपनीला २३२०४ कोटी रुपयांची जीएसटी थकबाकीची नोटीस बजावल्यामुळे ही कंपनी चर्चेत आली होती, आणि याच नोटीसीनंतर कंपनीचे शेअर्स मार्कट मध्ये कोसळले होते.