पणजी : काँग्रेसच्या कार्यालयावर व महिला कार्यकर्त्यांवर भाजपच्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेला हल्ला हा पूर्वनियोजित आहे. प्रत्यक्ष हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनीही भाग घेतला, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी येथे केला. तसेच तेंडुलकर आणि इतर हल्लेखोरांविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची व प्रदेश काँग्रेस समितीची संयुक्त बैठक शनिवारी पार पडली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणो, दिगंबर कामत, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, प्रतिमा कुतिन्हो यांच्यासोबत चोडणकर व कवळेकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना कधीच भाजपच्या कार्यालयावर मोर्चा नेऊन भाजपवाल्यांना मारहाण केली नव्हती. भाजपने मात्र राफेल प्रकरणी काँग्रेस हाऊसवर मोर्चा आणला व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो व इतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर बुट व बाटल्या फेकून मारल्या असे कवळेकर यांनी सांगितले. आम्ही संयुक्त बैठकीत याचा निषेध केला आहे. तसेच ज्या भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी ही गुंडगिरी केली, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलिस प्रमुखांसमोर ठेवत असल्याचे कवळेकर म्हणाले. गोव्यात भाजप सत्तेत आहे पण भाजपच कायदा हाती घेत आहे. गृह खात्याने अशावेळी डोळ्य़ावर बांधलेली पट्टी काढावी व राज्यात काय चाललेय ते पहावे. भाजपने यापूर्वी मांडवी पूल रोखला होता व लोकांचा रोष ओढवून घेतला होता. काही वर्षापूर्वी भाजपने म्हापशातील एका हॉटेलवर हल्ला करून तोडफोड केली होती. आता काँग्रेस हाऊसमध्ये भाजप कार्यकर्ते घुसले व रस्ताही अडवून लोकांना त्रास केला. त्यांनी लोकांची माफी मागावी, अशी मागणी कवळेकर यांनी केली.
काँग्रेस कार्यकर्ते फूल, समोसे घेऊन उभे होतेचोडणकर म्हणाले, की काँग्रेस पक्ष कायम शांततेच्या व लोकशाही मार्गाने जातो. भाजप मात्र नथुराम गोडसेच्या मार्गाने जातो. प्रतिमा कुतिन्हो, वरद म्हादरेळकर, विजय भिके व अन्य काँग्रेस कार्यकर्त्यांचे आपण अभिनंदन करतो. कारण आमचे कार्यकर्ते केवळ तेरा-चौदा होते. ते काँग्रेस हाऊससमोर भाजप कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी फुले, सामोसा वगैरे घेऊन उभे होते. तिथे तेंडुलकर व अन्य दोनशे भाजप पदाधिकारी आले व त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. मात्र काँग्रेस कार्यकर्ते पळून गेले नाही. त्यांनी शांततेच्याच मार्गाने त्यांचा प्रतिकार केला. प्रतिमाच्या दिशेने जो बूट भाजपने फेकून मारला. तो बुट प्रतिमाने पुन्हा भाजप कार्यकर्त्यांवर मारला नाही. दीड तास भाजपने वाहतुकीची कोंडी केली. सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. अशा अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई केली जावी.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस हाऊसवर केलेला हल्ला हा लोकशाहीतील काळा दिवस आहे. तो लोकशाहीवर हल्ला आहे. राफेल प्रकरणी जर बाजू मांडायची असेल तर ती संसदेत मांडा, असे दिगंबर कामत, रवी नाईक म्हणाले.