नारायण गावस
पणजी: राज्यातील विविध सरकारी अनुधानीत शाळामध्ये गेली आठ वर्षे कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या या ग्रंथपालांना फक़्त १४ हजार महिन्याला पगार दिला जात आहे. पगार वाढ करावी तसेच सेवेत कायम करावे या मागणीसाठी पणजी आझाद मैदानावर या ग्रंथपालांतर्फ़े पत्रकार परिषदे घेण्यात आली. यावेळी त्यांना पाठींबा देण्यासाठी समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर व शंकर पाेळजी उपस्थित होते.
आम्हाला पगार वाढ करावी तसेच सेवेत कायम करावे यासाठी २०१७ पासून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले जात आहे. एकूण १२८ जण आम्ही कंत्राटी तत्वावर सेवेत आहाेत. आम्हाला फक्त १० महिन्यांचा पगार दिला जातो. तोही वेळेवर दिला जात नाही. फक़्त १४ हजार रुपये पगार असल्याने घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न असतो. सर्व ग्रंथपाल हे मास्टर डिग्री घेतलेले आहेत. उच्च शिक्षित असूनही आम्हाला तुटपुंजा पगार दिला जात आहे. अन्य राज्यात ग्रंथपालांना चांगला पगार दिला जात आहे, असे गणेश वेळीप या ग्रंथपालाने सांगितले.
सरकारला या सर्वसामान्य लोकांचे काहीच पडलेले नाही. उच्च शिक्षित असून तुटपूंजा पगार दिला जात आहे. आपण स्वत: कमी शिकून विधान सभेत बसून स्वत:चा पगार वाढवून घेत आहेत. फक़्त मंत्री आमदारांना महागाई लागते? सर्वसामान्य लोकांना महागाई लागत नाही? या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शिक्षण संचालकांना निवेदन देणार आहोत.
या ग्रंथपालांनी पत्रकार परिषद घेतली म्हणून शाळेचे व्यावस्थापन किंवा शिक्षण संचालनालयाने त्यांना धमकी देण्याचे प्रकार घडले तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असे रामा काणकोणकर यांनी सांगितले. सरकार देत असलेला १४ हजार या पगाराने घर चालत नाही. एवढ्या महागाईत घर कसे चालवायचे. सर्व महाग झाले आहे पणा पगार मात्र कमी दिला जात आहे. या कंत्राटी कामगारांचे सरकारला काहीच पडलेले नाही, असे शंकर पाेळजी म्हणाले.