सूरज नाईकपवार, मडगाव : सर्व शासकीय भरतीसाठी कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान अनिवार्य करावे यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. शिक्षणतज्ज्ञांना विश्वासात घेऊन या दिशेने प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कोंकणीचे केवळ ज्ञान आवश्यक असल्याची सध्याची अट भविष्यात नीज गोंयकारांना सरकारी नोकरीपासून वंचित ठेवून बिगर गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्या बळकाण्यास मदत करेल, असा इशारा त्यांनी या पत्रातून दिला आहे.
कोंकणीला गोव्याची राजभाषा म्हणून मान्यता मिळाल्याची अधिसूचना तसेच सरकारी नोकरीतील गट अ, ब आणि क मधील सर्व सरकारी भरतींसाठी कोकणीचे केवळ ज्ञान गरजेचे असल्याचे बंधनकारक असल्याच्या विविध सरकारी अधिसूचनांचा आपल्या पत्रात संदर्भ दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी गट अ आणि ब पदांसाठी कोकणी केवळ ज्ञान अनिवार्य केले असल्याचे केलेले वक्तव्य नवीन नसल्याचे नमूद करुन जवळपास १० वर्षांपूर्वी सरकारने सदर निर्णयाची अधिसूचना जारी केली होती असे युरी आलेमाव यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे.
आमच्या पुढच्या पिढ्यांनी आपल्या मातृभाषेचा कोकणीचा अभ्यास केला पाहिजे यासाठी आपण दीर्घकालीन योजना तयार करणे आवश्यक आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान सरकारी अधिकारी आणि लोकांमध्ये संपर्क निर्माण करण्यास देखील मदत करते. मला आशा आहे की सरकार माझ्या सूचनेचा सकारात्मक विचार करेल, असे ते म्हणतात.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP) देखील मातृभाषेतील शिक्षणावर भर देते हे युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान सक्तीचे केल्यास, राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीलाही या निर्णयामुळे बळ मिळेल. सरकारने दीर्घकालीन दृष्टीकोनातून संपूर्ण भरती प्रक्रियेचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्याच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. गोव्यात राहणारा कोणीही बाहेरील व्यक्ती दोन महिन्यांच्या कालावधीत साध्या संभाषणासाठी कोकणी भाषेचे व्यवहार्य ज्ञान मिळवू शकतो कारण कोकणी ही शिकण्यासाठी तुलनेने सोपी भाषा आहे. हिंदी किंवा मराठी भाषिक व्यक्ती शाळांमध्ये कोंकणी न शिकता अल्पावधीत कोंकणीमध्ये लिहिणे आणि बोलण्याचे कौशल्य स्वीकारू शकते, असे युरी आलेमाव यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणले आहे.