फोंडा : फोंडा तालुक्यातील एक सब जिल्हा इस्पितळ व तीन ग्रामीण आरोग्य केंद्र मिळून डेंग्यूचे रुग्ण सापडण्याचा सपाटा चालू झाला असून ऑगस्ट महिन्यात एकूण 44 रुग्ण सापडल्याची नोंद झाली आहे. फोंडा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात वाढत्या डेंग्यू रुग्णाची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी सुयश शिनाय खांडेपारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी खास बैठक घेण्यात आली. आरोग्य केंद्राचे अधिकारी यावेळी हजर होते.
डेंग्यूवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व सरकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य खात्याच्या अधिकऱ्यांना सहकार्य करावे. तसेच प्रत्येक पंच सदस्यानी जबाबदारी घेऊन आपल्या प्रभागावर लक्ष ठेवण्याची मागणी यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ स्मिता पार्सेकर, स्वच्छता विभागाचे निरीक्षक मनोज नाईक व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर एवढ्या संख्येने डेंगूचा फैलव कसा काय झाला याच्यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी सुयश शिनाय खांडेपारकर यावेळी जास्त माहिती देताना म्हणाले की तालुक्यातील सर्व विहिरीची नोंदणी करण्याचा आदेश जलस्रोत खात्याला देण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या सर्व कामागराची माहिती आयडीसीने जवळील आरोग्य खात्याला देणे आवश्यक आहे. तालुक्यातील गट विकास अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक पंचायत क्षेत्रात पंचांना सावधगिरी बाळगण्यासाठी पत्र व्यवहार केला जाईल.
दरम्यान, फोंडा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक डेंग्यूचे १९ रुग्ण मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळून आले आहे. बेतकी - खांडोळा प्राथमिक आरोग्य केंद्रात १५, फोंडा आरोग्य केंद्रात ७ रुग्ण तर शिरोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ रुग्ण आढळून आढळले. मागचे काही वर्षे मलेरियाचे रुग्ण मिळण्याचे प्रमाण बंद झाले होते परंतु या वर्षी मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमच मलेरियाचा एक रुग्ण आढळला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे रुग्ण आढळलेल्या ठिकाणी जागृती करणे तसेच ठिकठिकाणी औषधांची फवारणी या सारखे निर्णय घेण्यात आले.