लोकमत न्यूज नेटवर्क पणजी :डेंग्यू तापाने गोव्यात धुमाकूळ घातला आहे. सध्या १८४० वयोगटातील युवकांना डेंग्यूची लागण झालेली आहे. कळंगुटमध्ये एका ३५ वर्षीय महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, किरकोळ तापही अंगावर काढणे जीवघेणे ठरणार आहे.
पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असतात. साधा थंडी-ताप आल्यास लोक इस्पितळात न जाता अंगावर दुखणे काढतात. नंतर कमी होत नसल्याचे जाणवताच इस्पितळची वाट धरतात. त्यामुळे मोठा फटका रुग्णांना बसतो. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश तापाने लोक त्रस्त झाले आहेत. शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील इस्पितळे फुल्ल झाली आहेत.
तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ, ताळगावसह म्हापसा, कांदोळी, फोंडा, वास्कोसह मडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य खात्याकडून उपाययोजना सुरू असून, लोकांनाही आजाराबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काय लक्षणे
पहिल्या स्थितीत रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडे आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणे, अशी लक्षणे दिसू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, डासाने चावा घेतल्यानंतर ४ ते १० दिवसांनी लक्षणे दिसू लागतात.
आहार काय घ्यावा
डेंग्यू रुग्णांनी होईल तेवढे पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ताजे अन्न, भाज्यांचे सूप, नारळाचे पाणी व फळांचा रस घ्यावा.
दिवसा चावणाऱ्या डासांपासून सावधान
डेंग्यू हा रक्त शोषणाच्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. एडीस जातीचे डास हा रोग पसरविण्याचे काम करतात. हे डास स्वच्छ पाण्यात पैदास होतात आणि ते केवळ दिवसा चावतात.
प्लेटलेट्ससाठी हे करा
डेंग्यू तापात मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने घटू शकते. प्लेटलेट्सचे प्रमाण ५० हजार प्रतिमायक्रोलिटर पेक्षा कमी होणे हे रुग्णासाठी धोक्याचे होऊ शकते. इस्पितळात प्लेटलेट्स घातले जातात, परंतु मानवी शरीरात जलद गतीने प्लेटलेट्स निर्माण होण्यासाठी पपईच्या कोवळ्या पानांचा रस फारच प्रभावी ठरतो.
आयुष्यात चार वेळा डेंग्यूचा धोका
कोविड विषाणूचे जसे वेगवेगळे स्ट्रेन आहेत तसे डेंग्यूचे ४ स्ट्रेन आहेत. एकदा डेंग्यू झालेला माणूस बरा होतो तेव्हा एका स्ट्रेनची प्रतिकारशक्ती त्याच्या शरीरात निर्माण होते. परंतु इतर तीन प्रकारचे डेंग्यू त्याला होण्याची शक्यताही असतेच.
शहरातील दाट लोकवस्ती जास्त वाढत आहे. व्हरांड्यात साचून राहणाया पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासांची पैदास होते. त्याबाबत लोकांनी काळजी घ्यावी. कोणीही अंगावर ताप न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. कल्पना महात्मे, मुख्य आरोग्य अधिकारी