पणजी: गोवा भेटीवर आलेले डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वॅन यानी कोविड महामारीच्या वेळी बंद झालेली डेन्मार्क- गोवा चार्टर विमाने पूर्ववत सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, 'दोन्ही गंतव्यस्थानांमधील चार्टर उड्डाणे पुन्हा सुरू करण्याबाबत ते आपल्या देशाकडे पाठपुरावा करणार आहेत.
डेन्मार्क आणि गोवा यांच्यात विविध क्षेत्रात तंत्रज्ञान आणि ज्ञानाची देवाणघेवाण होण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि गोवा विधानसभा संकुलालाही भेट दिली. जेथे त्यांचे सभापती रमेश तवडकर आणि राज्याचे जलसंपदामंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्वागत केले.
जुने गोवे येथे बॅसिलिका ऑफ बॉ जीझस चर्चला देखील त्यांनी भेट दिली. ते म्हणाले की, मला गोव्यात पर्यटनाची प्रचंड क्षमता दिसत आहे. मी परत जाईन आणि चार्टर विमानसेवा पुन्हा सुरू करू शकतो का हे पाहण्याचा प्रयत्न करीन.
ते म्हणाले की, डेन्मार्कचे पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात भेट देत असतात. कोविड महामारीच्या वेळी डेन्मार्क आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी काम करत होते तेव्हा असे आढळले की त्यांचे बहुसंख्य नागरिक गोव्यात होते.