लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: पर्यटन खात्याकडून पर्वरीत दीपोत्सव २०२३ साजरा केला जाणार आहे. यात भगवान कृष्णाद्वारे नरकासुर वध स्पर्धा असेल. ही स्पर्धा ही पौराणिक कथेला समर्पित तसेच भगवान श्रीकृष्णाचा योद्धा म्हणून उल्लेखावर केंद्रीत असेल.
'अखिल गोवा नरकासुर वध स्पर्धा' हाऊसिंग बोर्ड प्लॉट येथे, एससीईआरटी बिल्डिंग, सर्व्हिस रोड, पर्वरी येथे शनिवारी (दि.११) रात्री ९.३० पासून सुरू होईल. सहभागींना २.५० लाखांचे प्रतिष्ठित प्रथम बक्षीस १.५० लाखांचे दुसरे तर १ लाखांचे तिसरे बक्षीस जिंकण्याची संधी असेल. ही स्पर्धा एक मनोरंजनात्मक स्पर्धा असेल जी भगवान कृष्णाचे शौर्य आणि विजयाचे सार अंतर्भूत करेल.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, की गोव्यातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपण देत आहे. नरकासुर वध हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. जगभरातील लोक येथे येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतील आणि त्याचे वैश्विक आध्यात्मिक महत्त्व मान्य करतील. गोवा पर्यटन खाते सक्रियपणे आध्यात्मिक पर्यटनाला चालना देत असल्याचे त्यांनी सांगितले.
नरकासुर वध स्पर्धा व्यतिरिक्त, दीपोत्सव २०२३ मध्ये विविध प्रकारच्या आकर्षक स्पर्धा सादर केल्या जातील. ज्या प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच मोहून टाकतील. यामध्ये अखिल गोवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन', 'अखिल गोवा आकाश कंदील स्पर्धा' आणि 'अखिल गोवा फुगडी डान्स कॉम्पिटिशन' यांचा समावेश असेल. यातील प्रत्येक स्पर्धा गोव्यातील वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि कलात्मक प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी डिझाइन केली आहे. एकता व उत्सवाच्या भावनेला मूर्त रूप देत, दीपोत्सव २०२३मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.