लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बाणस्तारी अपघातात तिघांचा बळी घेणाऱ्या मर्सिडीझ कारची मालकीण मेघना सिनाय सावर्डेकर हिला अपघात पीडितांच्या वैद्यकीय खर्चासाठी २ कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने बुधवारी दिला.
पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याच्या बजावलेल्या समन्सना मेघनाने खंडपीठात आव्हान दिले होते. ही याचिका बुधवारी सुनावणीस आली असता मेघनाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, अपघातग्रस्तांच्या वैद्यकीय खर्चासाठी २ कोटी रुपये देण्याची मेघनाची इच्छा आहे. त्यावर खंडपीठाने दोन आठवड्यांत दोन कोटी रुपये रक्कम न्यायालयात जमा करण्यास सांगितली. बाणस्तारी अपघातात मृत्यू झालेल्यांना; तसेच जखमींसाठी ही रक्कम वापरली जाणार आहे; मात्र या रकमेचा मूळ भरपाईच्या रकमेवर जो निर्णय होईल, त्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मेघना हिची खंडपीठातील याचिका ही म्हार्दोळ पोलिसांच्या समन्सना आव्हान देणारी होती. म्हार्दोळ पोलिसांनी मेघनाला पोलिस स्थानकात उपस्थित राहण्याची, वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स बजाविले होते; आता हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे गेल्यानंतर तिच्या याचिकेला किती महत्त्व राहिले आहे, त्यावर न्यायालयच निर्णय घेणार आहे. कारण क्राईम ब्रँचने सूत्रे हाती घेतल्यावर मेघनाची आणि तिच्या मुलींचीही वैद्यकीय चाचणीही मंगळवारी झाली.
६ ऑगस्ट रोजी बाणस्तरी येथे झालेल्या भीषण अपघातात सुरेश फडते आणि भावना फडते या दिवाडी येथील दाम्पत्याचा आणि अरूप करमाकर या बांदोडा येथील युवकाचा मृत्यू झाला होता. फोंडा येथील वनिता भंडारी, बाणस्तरी येथील शंकर हळर्णकर आणि ताळगाव येथील राज माजगावकर हे गंभीर जखमी झाले होते.
दोन २ कोटींचे असे वाटप
मेघनाकडून न्यायालयात जमा करण्यात येणाऱ्या २ कोटी रुपयांपैकी ५० लाख रुपये हे अपघातात निधन झालेल्या सुरेश फडते आणि भावना फडते दांपत्याच्या वारसदारांना दिले जातील. अपघातात मृत्यू झालेल्या तिसरा व्यक्ती अरूप करमाकर यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये दिले जातील. जखमी विनिता भंडारी, राज माजगावकर आणि शंकर हळणकर यांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जातील. बाकी राहिलेले २५ लाख रुपये राष्ट्रीयकृत बँकेत जमा केले जातील आणि त्याचा वापर गरजेनुसार केला जाईल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
अटकपूर्व जामिनावर शुक्रवारी युक्तिवाद
फोंडा : बाणस्तारी अपघातप्रकरणी मेघना सावर्डेकर हिच्या वकिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर आता शुक्रवारी युक्तिवाद होणार आहे. बुधवारी सरकारी वकील गैरहजर राहिल्याने हा युक्तिवाद पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, तिच्या अटकपूर्व जामिनावर चर्चा करण्यासाठी बुधवारी तारीख देण्यात आली. युक्तिवाद करण्यासाठी तिचे वकील तयारीनिशी न्यायालयात हजर होते. परंतु, सरकारी वकील आजाराच्या कारणास्तव न्यायालयात हजर न राहिल्याने सदरचा युक्तिवाद शुक्रवारी जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे.