केपे: उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आपल्या केपे मतदारसंघात लोकांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण करण्यासाठी प्रशासन तुमच्या दारी असा स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. या कार्यक्रमात दर गुरुवारी उपमुख्यमंत्री सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना घेऊन प्रत्येक वाड्यावर जात आहेत. सध्या हा कार्यक्रम केपे नगरपालिका विभागांमध्ये चालू आहे.
प्रभाग क्र १,२,३ मध्ये आत्तापर्यंत असा कार्यक्रम झाला आहे. तसेच फातर्पा पंचायतीतही असा कार्यक्रम झाला आहे. यापूर्वी दर गुरुवारी उपमुख्यमंत्री केपे नगरपालिका सभागृहात जनता दरबार लावून जनतेच्या समस्या ऐकायचे. पण कोरोनाच्या संसर्गानंतर दरबारात होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासन आपल्या दारी ही नामी शक्कल त्यांनी लढविली. प्रशासकीय यंत्रणेमध्ये सा. बां. खात्याचे अधिकारी, पाणी पुरवठा खाते, विज खाते, कृषी खाते, नगर नियोजन खाते, नगरपालिका प्रशासन, गरज भासल्यास आरोग्य खात्याच्याही लोकांना पाचारण केले जाते.
या कार्यक्रमात लोक विविध विषय मग ते स्थानिक रस्त्याचे असो किंवा, पिण्याच्या पाण्याचे असो, किंवा सामाजिक विषय मांडतात. विशेष म्हणजे इथे पूर्णपणे खुली चर्चा होते, अधिकारी पुढच्या कारवाईची योजना मांडतात ज्याची नोंद होते आणि विषय पुढे जातो. काही ठिकाणी मग उपमुख्यमंत्री अधिकाऱ्यांना कानपिचक्याही देताना दिसले. बराच काळ रखडलेली कामे ह्या कार्यक्रमात सुटताना दिसतात.
यावेळी उपमुख्यमंत्री कवळेकर त्यांच्या या नवीन योजनेबद्दल बोलताना म्हणाले की, जनतेचे प्रश्न मध्यंतरी कसे सोडवावे असा एक पेच माझ्या समोर होता. कोविड मुले गर्दी टाळावी आणि सगळे अधिकारी समोरा समोर असल्याशिवाय कामे होत नाहीत,म्हणून ते म्हणाले कि प्रशासनालाच लोकांपर्यंत घेऊन जायचे ठरविले.
यावेळी आपली मते प्रकट करताना केपे नगरपालिका वॉर्ड क्र ३ मधील रहिवाशी सना बी म्हणाली की उपमुख्यमंत्र्यांच्या हा उपक्रम सराहनीय आहे. आत्ता पर्यंत घरी पाण्याची समस्या होती कारण त्याभागात येणारी पाईपलाईन छोटी होती. आज इथे समस्या मांडल्यानंतर त्वरित सोमवारी अधिकाऱ्यांनी येऊन जोड तपासणी करण्याचे आश्वासन दिले आहे,व न झाल्यास उपमुख्यमंत्र्यांनी पुढच्या गुरुवारी आपल्याला सांगा असे सांगितले असल्याचे त्या म्हणाल्या. आणखीन एक रहिवास्याने भागात पावसाचे पाणी तुंबत असल्याची तक्रार केली,लागलीच उपमुख्यमंत्र्यांनी अभियंत्याला ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले व त्याचा अहवाल आपल्याला एका महिन्यात देण्यास सांगितला .