पणजी : उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी गोव्यात बदली होऊन येणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठविताना हे अधिकारी गोव्यात राहायला बघत नाहीत. तसेच ते वरचेवर दिल्लीवाऱ्या करीत असल्याने प्रशासनावर परिणाम होतो, असा आरोप केला आहे. या अधिकाऱ्यांना गोव्यात बदली हवी असते; परंतु एकदा ताबा घेतला की दिल्लीवारीसाठी संधीची ते वाटच पाहात असतात, असे डिसोझा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. सचिव म्हणून काम करणारे आयएएस अधिकारीच जेव्हा उपलब्ध नसतात तेव्हा प्रशासनावर त्याचा परिणाम होतो, असे ते म्हणाले. राज्य सरकारची काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे. व्यवस्थेत काही दुरुस्त्या घडवून आणण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच व्यवस्थेबद्दल तक्रार करतो. ती सुधारण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान, खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रश्नावर विचारले असता, मुख्यमंत्र्यांवर अजून नाराजी असल्याचा त्यांनी इन्कार केला. या विषयावरून आपण पक्ष किंवा सरकारविरोधात कधीच बोललेलो नाही. केवळ व्यवस्थेतील ज्या त्रुटी आहेत, त्या दूर कराव्यात असे भाष्य केल्याचे डिसोझा म्हणाले. मला वैयक्तिक मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ आपण पक्षाविरोधी बोलतोय, असा होत नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
आयएएस अधिकाऱ्यांवर उपमुख्यमंत्र्यांची तोफ
By admin | Published: April 26, 2016 1:40 AM