हरियाणातील फरिदाबाद येथील एका मुलीचं लग्न हिसार येथील एका मुलाशी गोव्यात २६ जानेवारी झालं. मॅट्रिमोनिअल साइटद्वारे दोघांचं लग्न जुळलं होतं. मुलगा एमबीबीएस करत आहे आणि त्याचे आई-वडील डॉक्टर आहेत. मात्र, लग्नानंतर अशी काही घटना घडली की नववधूला धक्काच बसला. वरानं तिला गोवा विमानतळावर सोडून पळ काढल्याची घटना घडली.
यातील मुलगा म्हणजेच वर अबीर हा हिस्सारचा रहिवासी आहे. त्याचे वडील अरविंद गुप्ता आणि आई आभा गुप्ता हे डॉक्टर आहेत. अबीर नेपाळमध्ये शिकत आहे. गुप्ता दाम्पत्य हिसारमध्ये हॉस्पिटल चालवतात. याप्रकरणी वधूच्या वडिलांचे म्हणणं आहे की, अबीरच्या पालकांनी मॅट्रिमोनियल साइटवर मुलीचा बायोडेटा पाहिला होता. यानंतर लग्नाची चर्चा झाली आणि लग्न ठरवण्यात आलं. लग्नासाठी यावर्षी २६ जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यांनी २५ लाखांची मागणी केली, तीही पूर्ण करण्यात आली.
लग्नापूर्वी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार हेदेखील ठरलं होतं. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असून वधू आणि वर दोघेही खर्च उचलतील. मात्र दोन दिवसांचा कार्यक्रम तीन दिवसांपर्यंत वाढवण्यात आला. यानंतर वराच्या पालकांनी बीएमडब्ल्यू कारची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं. मागणी पूर्ण झाल्यावरच वधूला सोबत घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कशीतरी विनवणी केल्यानंतर त्यांनी तिला नेण्याचा निर्णय घेतला. पण, अबीरचे कुटुंबीय मुलीच्या कुटुंबीयांना न भेटता आणि खर्चाचा वाटा न देता निघून गेले. त्यानंतर पैसे न दिल्याने तेथील ऑपरेटर्सनी त्यांना ओलीस ठेवले. नातेवाइकांकडून पैसे मिळवून कसंबसं त्यांनी भाडं दिल्याचंही ते म्हणाले.
नववधुला घेऊन पोहोचला एअरपोर्टवरयानंतर नवरा नवरीसोबत विमानतळावर पोहोचला. त्यानंतर त्यानं तिला तिकडेच थांबण्यास सांगून लगेच परततो असंही म्हटलं. परंतु तो परत आलाच नाही. मोबाईलही बंद केला. यादरम्यान, मुलाची आईदेखील एअरपोर्टवर आली आणि मुलीकडून दागिन्यांची बॅग घेऊन फरार झाली. यानंतर मुलीनं फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला.
सीसीटीव्हीत घटना कैदमुलीनं सांगितलेला प्रकार ऐकून तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचले आणि अबीरचा शोध घेतला. सीसीटीव्हीमध्ये तो पळ ठोकताना दिसून आला. यानंतर काही लोकांच्या मदतीनं त्याला अटक करण्यात आली. दरम्यान फरीदाबाद पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसंच आतापर्यंत २ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच हुंडा मागणाऱ्या या कुटुंबाविरोधात कारवाईची मागणीही त्यांनी केलीये.