सुशांत कुंकळयेकर
मडगाव - ड्रग्स व्यवसायात असलेल्या नायजेरियन नागरिकांची गोव्यातील ‘ओव्हर स्टे’ (बेकायदा वास्तव्य) ही गोवापोलिसांची डोकेदुखी बनलेली असतानाच आता म्हापशात उघडले जाणारे ‘डिटेन्शन सेंटर’ हा त्यांच्यासाठी आशेचा किरण बनण्याची शक्यता आहे. हे केंद्र म्हापशातील जुन्या ज्युडिशियल लॉकअपच्या इमारतीत सुरू होणार आहे.
परबावाडो-कळंगुट येथे रविवारी कळंगूट पोलिसांनी अटक केलेल्या फ्रँक नाथानील या संशयिताकडेही गोव्यात वास्तव्य करुन राहण्यासाठी कुठलेही वैध कागदपत्रे नसल्याचे उघडकीस आल्यानंतर कळंगूट पोलिसांनी त्याच्या विरोधात बेकायदा वास्तवाचा नवीन गुन्हा नोंद केला आहे. रविवारी त्याला 11 लाखाच्या सिंथेथीक ड्रग्ससह कळंगूट पोलिसांनीच अटक केली होती. या घटनेनंतर पुन्हा एकदा नायजेरियन्सांचे गोव्यातील बेकायदा वास्तवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आतापर्यंत गोवा पोलिसांनी 13 विदेशी नागरिकांना गोव्यात बेकायदा वास्तव्य केल्याबद्दल अटक केली असून त्यात सात नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. त्याशिवाय तांझानिया व युगांडा येथील प्रत्येकी दोन तर केनिया व अफगाणिस्तान येथील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.
अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांना या संदर्भात विचारले असता, गोव्यात रहात असलेल्या नायजेरियनांपैकी 90 टक्के नागरीक बेकायदा वास्तव्य करुन रहात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र देशातील वेगवेगळ्या भागातून ते गोव्यात येत असल्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवता येणो शक्य नाही असेही ते म्हणाले. मात्र गोव्यात सुरू होणाऱ्या ‘डिटेन्शन सेंटर’मुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या समस्येवर नियंत्रण येऊ शकेल असे त्यांनी सांगितले.
डिटेन्शन सेंटर म्हणजे, जर कुठल्याही विदेशी नागरिकाने किरकोळ स्वरुपाचा गुन्हा केला तर या केंद्राद्वारे त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मायदेशी त्वरित रवानगी करणे शक्य होणार आहे. यात बेकायदा वास्तव्य करुन राहिलेल्या विदेशी नागरिकांचा समावेश होऊ शकतो. अशाप्रकारची केंद्रे दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरात स्थापन केलेली आहेत. मात्र गोव्यात अद्याप ते स्थापन केलेले नव्हते. गोवा पोलिसांनी कित्येक वर्षे समाज कल्याण खात्याकडे ही मागणी लावून धरल्यानंतर आता हे केंद्र स्थापन करण्याच्या बाबतीत या खात्याने पावले उचलली आहेत.
म्हापशातील जुन्या ज्युडिशियल लॉकअपमध्ये सुरू होणाऱ्या या केंद्राची रंगरंगोटीही पूर्ण झाली असून येत्या वर्षी ते सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा ड्रग्स व्यवसायात अटक केलेल्या विदेशी नागरिकांमध्येही नायजेरियनांचा समावेश अधिक आहे. एकूण 37 विदेशी संशयितांपैकी 23 संशयित नायजेरियाचे असून रोमानिया व रशिया या देशातील प्रत्येकी तीन, नेपाळातील दोन तर फ्रान्स, हंगेरी, युके, ओमान, टर्की व जॉर्डनच्या प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.