पणजी : पावसाळ्यात बांबोळी येथील गोमेकॉ नजिकच्या सब वेमध्ये पाणी भरत असल्याने लोकांचे हाल होतात. यंदा ही स्थिती टाळण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात. तशीच त्याच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करावी अशी सूचना सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी सरकारी यंत्रणांना केली आहे.
या सब वे ची आमदार बोरकर, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (जीएसआयडीसी ), सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्लुडी ), राष्ट्रीय महामार्ग तसेच गाेमेकॉच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाहणी केली. या पाहणी नंतर ते बोलत होते.
आमदार बोरकर म्हणाले, की जुना सब वे मोडून २०१७ मध्ये हा नवा सब वे बांधला होता. या सब वे चे संपूर्ण काम जीएसआयडीसी ने केले होते. या परिसरात गाेमेकॉ इस्पितळ, दंतवैद्यकीय महाविद्यालय व कुजिरा शैक्षणिक संकुल आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांची मोठी गर्दी असते. मात्र पावसाळ्यात या ठिकाणी पाणी भरत असल्याने वाहनचालकांचे हाल होतात. यंदा ही स्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.