लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: मंगळवारी (दि. २२) होणाऱ्या वास्कोतील १२४ व्या श्री दामोदर भजनी सप्ताहनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १२.३० वा. देव दामोदर चरणी श्रीफळ अर्पण केली जाईल. त्यानंतर मनोहर मांद्रेकर यांच्या गायनाने अखंड २४ तासाच्या भजनी सप्ताहाची वर्ष पद्धतीनुसार सुरवात होईल. सप्ताहाला उपस्थित राहून भक्तांनी देवाचा आर्शीवाद घ्यावा, असे आवाहन केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी यांनी केली आहे. या भजनी सप्ताहाची बुधवारी (दि. २३) दुपारी १२.३० वा. 'गोपाळा काला गोड झाला'च्या जयघोषात समाप्ती होणार आहे.
दि. २२ रोजी उत्सव समितीतर्फे सप्ताह दिनी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सप्ताहाच्या अधी सोमवारी (दि. २१) नागपंचमी दिवशी वास्कोतील देव दामोदर मंदिरात सकाळी जोशी कुटुंबातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी आरती व सायंकाळी ५ वा. भजन होणार आहे.
त्यानंतर मंदिरासमोरील व्यासपीठावर संध्या. ६.३० वा. भारत नाट्यम कार्यक्रम होईल. संध्या. ७ वा. शास्त्रीय गायक स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबलासाथ दत्तराज शेट्ये, पखवाज किशोर तेली, ऑर्गन - दत्तराज सुलकर, हार्मोनियम- दत्तराज म्हाळशी, बासरी - रोहीत वनकर, साईड रिदम योगेश रायकर हे संगीतसाथ करतील. याचे निवेदन गोविंद भगत करणार आहेत
दि. २२ रोजी श्री दामोदर मंदिरात दु. १२.३० वाजता 'श्रीं' च्या चरणी श्रीफळ ठेवल्यानंतर अखंड चोवीस तासाच्या भजनी सप्ताहाला प्रारंभ होईल. सायंकाळी नटराज थियटर समोरील उत्सव समितीच्या भव्य मंडपात संध्या ६ ते ७.३० यावेळेत मुरगाव पत्तन न्यास फैलवाले कामगार संघातर्फे दीपाली देसाई (मुंबई) व सुशांत गावस (सत्तरी गोवा) यांची गायनाची मैफल होणार आहे. त्यांना साथसंगत हार्मोनियम चांगदेव नाईक, तबला ओमप्रकाश गावस, पखवाज- वीराज गावस, मंजिरी - गुरुदास गावस. रात्री फैलवाले संघाची संगीत मैफल जोशी चौक टॅक्सी स्टॅण्ड समोरील व्यासपीठावर होईल. नाभिक समाजातर्फे रात्री ८ ते ९.३० वा. ऋषिकेश साने यांचा गायनाचा कार्यक्रम नटराज थिएटर समोर होईल. त्यांना हामोनियम दत्तराज म्हाळशी, तबला- अमेय पटवर्धन, पखवाज शुभम नाईक, किशोर तेली साथसंगत करतील. नंतर जोशी चौकासमोर नाभिक समाजाची भजनाची बैठक होणार आहे.
दैवज्ञ ब्राह्मण समाजातर्फे रात्री ९.३० ते ११ वा. गायक शर्वरी नागवेकर (वैद्य) यांचे गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ प्रसाद गावस, तबला प्रसन्न साळकर, पखवाज विशांत सुलकर हे संगीतसाथ करतील. नंतर दैवज्ञ ब्राह्मण समाजाची भजनाची बैठक जोशीचौक जवळील टॅक्सी स्टॅण्ड समोरील व्यासपीठावर होईल.
श्री दामोदर भजनी सप्ताह बाजारकर समितीतर्फे रात्री ११ ते १२.३० पर्यन्त गायक अमोल बावडेकर, देवानंद मालवणकर, प्रियंका रायकर यांचा गायनाचा कार्यक्रम नटराज थिएटर जवळील व्यासपीठावर होणार आहे. त्यांना हार्मोनियम- सुभाष फातर्पेकर, तबला - संकेत खलप, पखवाज- साईल कांबळी, साईड रिदम - योगेश रायकर, व्हायोलिन कविता पैं हे संगीतसाथ करणार आहे. नंतर जोशी चौक समोरील टॅक्सी स्टॅण्ड जवळ उभारलेल्या व्यासपीठावर संगीत मैफल होणार आहे.
ओवळेश्वर गोपाळकृष्ण गाडेकर समाजातर्फे मुरगाव पालिका गणेशोत्सव मंडपात रात्री ११ ते १.३० वाजेपर्यंत गायक तेजस मेस्त्री व अनघा घोकटे यांच्या गायनाची मैफल होईल. त्यांना हार्मोनियम अमित मेस्त्री, तबला भावेश राणे, पखवाज मनीष - ताबोस्कर, ताळ तेजश गडेकर हे - संगीतसाथ करणार आहेत. रात्री १.३० ते ४ वाजे पर्यंत गायक किरण रायकार, रुग्वेदा देसाई यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. तर मुरगाव पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ श्रीराम विश्वकर्मा ब्राम्हण समाजातर्फे देवराज कारबोटकर, चेतन हरमलकर, निखिल आसुलकर, सुनील दिवकर यांच्या भजनाची मैफल होईल. त्यांना हार्मोनियम साथ अमित मोरजकर, तबला- राजन च्यारी संगीतसाथ करतील.
सप्ताह निमित्ताने आयोजित केलेल्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी रविवारी (दि.२०) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वास्को दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) केंद्रीय समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी, यंदाच्या दामोदर भजनी सप्ताह (बाजारकर) उत्सव समितीचे अध्यक्ष विष्णु गारोडी, सचिव विनायक घोंगे, खजिनदार दामू कोचरेकर आणि सदस्य रघुनाथ खोबरेकर उपस्थित होते.