वास्को: ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण कीती सत्य आहे याची प्रचिती गुरूवारी (दि.१८) नवीन जुवारी पूलावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना तेथे चारचाकी आणि टेंम्पोत घडलेला अपघात पाहून नक्कीच झाली असावी. नवीन जुआरी पूलावरून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या निखील आगरवाडेकर (वय २८) याचा त्याच्या चारचाकीवरील ताबा सुटून ती पूलाच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर धडक देऊन पूलाच्या दुसऱ्या बाजूला पोचली. त्यावेळ पूलाच्या दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या टेंम्पोवर निखीलच्या चारचाकीची जबर धडक बसून चारचाकी पुन्हा दुभाजकाला धडकून ह्या बाजूला आली. या भीषण अपघातात चारचाकीचा चुराडा होण्याबरोबरच टेंम्पोचे नुकसान झाले. तसेच अपघातात नवीन जुआरी पूलावरील पथदिप खांबाला वाहनाची धडक बसल्याने खांबही खाली कोसळला. अपघात अत्यंत भीषण होता, मात्र त्यातून दोन्ही वाहनांच्या चालकांना कीरकोळ जखमा होऊन ते बाल बाल बचावल्याची माहीती पोलीसांनी दिली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार दुपारी १.३० वाजता तो भीषण अपघात घडला. म्हापसा येथे राहणारा निखील आगरवाडेकर दुपारी जुआरी पूलावरून पणजीच्या दिशेने चारचाकीने जात होता. भरधाव वेगाने वाहन चालवत जाताना जुआरी पूलावर निखीलचा अचानक चारचाकीवरील ताबा सुटून त्याच्या चारचाकीने पूलाच्या मधोमद असलेल्या दुभाजकाला जबर धडक दिली. धडक देऊन निखीलची चारचाकी पूलाच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूत जाऊन पोचली. त्यावेळी नवीन जुआरी पूलाच्या दुसऱ्या बाजुतून कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या टेंम्पो (क्र: जीए ०३ एन ३७६६) ची जबर धडक निखीलच्या चारचाकीवर बसली. दोन्ही वाहनात झालेली धडक एवढी जबरदस्त होती की निखीलची चारचाकी पुन्हा दुभाजकाला धडकून ह्या दिशेने आली. त्या अपघातात एका वाहनाची धडक पूलावरील एका पथदिप खांब्यावर बसल्याने तो खांबा खाली कोसळला. सुदैवाने खांबा कोसळण्यावेळी तेथून कुठलेच वाहन जात नसल्याने तेथे होणारा पुढचा अनर्थ टळला. अपघात एकढा भीषण होता की त्यात चारचाकीचा चुराडा झाला असून टेंम्पोच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.
जुआरी पूलावर चारचाकी आणि टेंम्पोत भीषण अपघात झाल्याचे तेथून जाणाऱ्या वाहन चालकांना दिसून येताच ते त्वरित अपघातात सापडलेल्यांच्या मदतीसाठी धावले. चुराडा झालेल्या चारचाकीत निखील एकटाच प्रवास करत असल्याचे दिसून आल्यानंतर लोकांनी त्याला त्वरित बाहेर काढून उपचारासाठी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवले. तसेच अपघातात सापडलेल्या टेंम्पोचा चालक प्रकाश राऊळ (वय ४८, मूळ रा: सावंतवाडी) याला कीरकोळ जखमा झाल्याचे आढळून आल्यानंतर त्यालाही उपचारासाठी इस्पितळात पाठवले. अपघातात चुराडा झालेल्या चारचाकी चालक निखीलच्या पाय इत्यादी ठिकाणी जखमा झाल्या असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहीती पोलीसांनी देऊन त्याच्यावर इस्पितळात उपचार चालू असल्याचे सांगितले. पोलीसांनी अपघाताचा पंचनामा करून त्यांच्या कडून अधिक तपास चालू आहे.