Devendra Fadnavis on Utpal Parrikar: गोव्यासह पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर झाल्या आणि प्रचाराला जोर आला. गोव्यात कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला कुठून निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. गोव्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर.उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. पण तसं घडताना दिसत नाहीये. त्यामुळे भाजपने उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाकारून योग्य केलं नाही अशी टीका इतर पक्षांनी केली. पण या संदर्भात आज दिल्लीतील पत्रकार परिषदेत भाजपचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.
"पणजी मतदार संघातून भाजपचे विद्यमान आमदारांनाच तिकीट देण्यात आले आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांना आम्ही इतर दोन मतदारसंघाचे पर्याय दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे. पण दुसऱ्या पर्यायाबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. मला असं वाटतं की दुसऱ्या पर्यायाबद्दल ते सकारात्मक उत्तर देतील.
आम्हाला मनोहर पर्रिकर यांच्याविषयी आणि त्यांच्या परिवाराविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असोत किंवा दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्यात परिवारातील कोणताही सदस्य असो, ते सर्व जण आमच्या परिवाराचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिवाराप्रमाणेच आहे. ते सर्व जण आमचे अगदी जवळचे आहेत", असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, उत्पल पर्रिकरांना उमेदवारी देण्यात शिवसेना तयार आहे आणि ते जर अपक्ष लढत असतील तर त्यांच्याविरोधात कोणीही उमेदवार देऊ नये, तीच मनोहरभाईंना खरी श्रद्धांजली ठरेल, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. तर, उत्पल पर्रिकरांचा होकार असल्याचा आप त्यांना उमेदवारी देईल, असं गोव्यातील आपचे उपाध्यक्ष म्हणाले होते.