पणजी: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता नवीन मुद्द्याची भर पडली आहे. मुंबईतील राजभवन येथील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तुमच्या मंत्र्यांप्रमाणे जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेले बरे, तिथे गेल्याने सद्बुद्धी मिळेल, असा टोला भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस आताच्या घडीला गोव्यात प्रचारात मग्न आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. यावर, राजभवर जाणे म्हणजे ती योग्य जागा आहे, त्या ठिकाणावर तर आक्षेप घेता कामा नये. तुमचे मंत्री जेलमध्ये जातायत. आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातायत हे मला सांगताही येत नाही. त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा, राजभवनावर गेल्यावर सद्बुद्धी मिळेल, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाराष्ट्राची लूट चालली आहे, ती बंद होईल
महाराष्ट्राची लूट चालली आहे, ती बंद होईल. त्यामुळे सद्बुद्धी घेण्यासाठी तरी राज्यभवनावर जावे, असे सांगत संजय राऊत जे डायलॉग ते मारतात, ते पाचवीतील मुलेही मारत नाहीत, कोण घाबरणार यांना, ते अस्वस्थ आहेत, ते दिसते आहे. त्यामुळे मनात येईल, ते बोलायचे हे कोण खपवून घेणार नाही. कुणी काही बोलून चालत नसते, जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही अशा गोष्टी ऐकणार नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना दिले. ते टीव्ही ९ शी बोलत होते.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भाजप नेते सारखे राजभवनावर राज्यपलांकडे जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात. त्यावर बोलताना राजकीय हवा कशीही असू द्या. पण, मलबार हिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
दरम्यान, किरीट सोमय्या यांचा जो व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सोमय्या यांच्या हत्येचा कट दिसतोय. लोकशाही, पुरोगामी महाराष्ट्र हाच काय, तुमचे भष्ट्राचार बाहेर काढले तर मारायचे का, असा थेट सवाल करत तुम्ही काही केले तरी भष्ट्राचार बाहेर काढणार. तुम्ही अंगावर आलात तर सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.