कवळे देवदेवतांच्या पवित्र वास्तव्यामुळे पुनित झालेला गाव. गावात प्रवेश केल्यावर दिसू लागतात आकाशाला भिडू पाहाणारे मंदिरांचे कळस व मनाला शांतवणारं निसर्ग सौंदर्य. अशा या परिसरात प्रसिद्ध ग्रामदैवत कपिलेश्वर आहे. याच कपिलेश्वर पंचायनात कपिलेश्वर, कमलेश्वर, भगवती, वेताळ, गणपती तसेच आगापूर येथील माधव रामेश्वर व गोविंद इतकी दैवते येतात.
या ढवळी येथे स्थायिक झालेली एक देवता, भगवती मंदिर ढवळी येथे कधी व कोणी बांधले याबद्दल माहिती उपलब्ध नाही. पण एका आख्यायिकेनुसार श्री भगवतीचे मूळ स्थान वरचा वाडा ढवळी येथे श्री. बेहरे यांच्या घरामागे होते व आजही जुने मंदिर व तळीचे अवशेष तिथे पाहायला मिळतात.
खूप वर्षांपूर्वी खालचावाडा ढवळी येथे एक राक्षस लोकांना खूप त्रास द्यायचा व त्याचा नाश करण्यासाठी देवी वरचावाडा ढवळी येथून पांडग कुणा पाचूर वामनेश्वर मंदिरे उडे बोडकेभाट बांगाल असा प्रवास करत आली व त्या राक्षसाचा वध करून तिथेच राहिली असे सांगितले जाते.
प्रसिद्ध इतिहास संशोधक रोहित फळगांवकर यांच्या मते जुन्या मूर्तीचा काळ हा सहाशे वर्षांहून अधिक आहे. १९७०-७५ साली भगवतीचे मंदिर कौलारू होते व लाकडी खांबावर उभे होते. १९८१ साली स्व. हरीभाऊ बोरकर यांच्या पौरोहित्याखाली व देवेंद्र ढवळीकर यांच्या यजमानपदाखाली देवी भगवतीचे गर्भगृह बांधून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा कार्यक्रम १० फेब्रुवारी १९८१ ते १२ फेब्रुवारी १९८१ या काळात झाला. भगवती ही नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. देवीच्या गर्भगृहाचे काम पूर्ण झाले होते व सर्व भक्तांना मंदिर उभारण्याचा ध्यास लागला होता. लहान का होईना पण मंदिर झालेच पाहिजे व त्यादृष्टीने देवीचे महाजन, कुळावी भक्त सर्वजण आपापल्या परीने कामाला लागले व भगवती देवीने यश दिले. २०१० साली कळस, फरशी खांबे बांधून कौलारू मंदिर उभे राहिले. भगवती मंदिरात नवरात्र, जत्रोत्सव, गंधपूजा, श्रावणी शुक्रवार, पालखी असे उत्सव साजरे होतात. भगवती देवीचा वार्षिक जत्रोत्सव माघ शुद्ध त्रयोदशी या तिथीला साजरा केला जातो.
कपिलेश्वर पंचायतन अध्यक्ष देवेंद्र ढवळीकर यांनी मंदिर उभारणीचे शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान घेतले व त्यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला. प्रसिद्ध वास्तुशिल्पी व्यंकटराव शिरगांवकर यांनी देवळाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी घेतली, मनोज आमशेकर इंजिनियर यांची साथ त्यांना लाभली व २२ नोव्हेंबर २०१२ रोजी नूतन मंदिराचे भूमिपूजन झाले. स्थानिक ठेकेदार दीपक रघू नाईक यांनी नूतन मंदिर बांधण्याचे काम हाती घेतले. आर्थिक तसेच बांधकाम साहित्याची उपलब्धता त्याचप्रमाणे इतर अनेक अडचणींवर मात करून कपिलेश्वर देवस्थान व्यवस्थापन मंडळाने भगवती मंदिराचे बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केले. ही श्री भगवतीची प्रेरणा आणि कृपाच आहे.
श्री भगवती प्राचीन काळापासून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळेच एवढा मोठा प्रकल्प आपण आत्मविश्वासाने ठरलेल्या मुदतीत पूर्ण करू शकणार याची खात्री आणि आत्मविश्वास व्यवस्थापन मंडळाला होता आणि त्यामुळेच एवढा मोठा प्रकल्प नियोजित मुदतीत पूर्ण होऊ शकला. असंख्य भक्तगणांची श्रद्धा आणि दातृत्व या कामी सहाय्यभूत ठरले.