लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: शिरगाव येथील श्रीदेवी लईराईचे धोंड तसेच भाविकांसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व वक्तव्य केल्याप्रकरणी सोमवारी डिचोलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. देवीचे धोंड व संतप्त भाविकांनी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक देत श्रेया धारगळकर व इतर अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे.
यावेळी शेकडो भाविकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत संबंधितांच्या अटकेची मागणी केली. त्यांच्यासोबत आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. भक्तांनी देवीचा जयजयकारच्या घोषणा दिल्या. तसेच श्रेया धारगळकर यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. जमावाने लेखी तक्रार डिचोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल नाईक यांच्याकडे देत त्वरित कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.
अॅड. दत्तराज न्हावेलकर यांनी याप्रकरणी सर्वांनी संघटित राहून अशा प्रकारच्या शक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून, यासंदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन भाविकांना दिल्यानंतर भाविक शांत झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेया धारगळकर यांना यापूर्वीच एका प्रकरणात अटक केलेली आहे. त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. यासंदर्भात डिचोली पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार आम्ही पुढील कारवाई निश्चित करू, अशा प्रकारचे आश्वासन पोलिस निरीक्षक राहुल नाईक यांनी दिले, त्यानंतर जमाव शांत झाला.
भाविकांच्या भावना दुखावणे हे चुकीचे व गैर असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जात आहे. असा प्रयत्न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई व्हायला हवी. त्यामुळे संबंधितांना अटक होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. - डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार.
यांनी संबंधित महिलेने व्हिडीओ पोस्ट करून हजारो भाविकांच्या भावना दुखावलेल्याचे सांगत सामाजिक तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिला अटक करण्याची मागणी केली. - प्रेमेंद्र शेट, आमदार.
नमिताला कोठडी, तर श्रेया इस्पितळात
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेल्या नमिता फातर्पेकर हिला केपे प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अन्य एक संशयिता श्रेया धारगळकर हिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पिळात दाखल केले आहे. जोपर्यंत तिच्यावर इस्पितळात उपचार चालू राहतील तोपर्यंत तिला तिथे ठेवावे व डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा न्यायालयात उभे करावे, असा निर्देश न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणातील अन्य एक संशयित अभिषेक नाईक हा अजूनही पसार असून, त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान व महाजनांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करत धार्मिक भावना भडकाविल्याप्रकरणात कुंकळ्ळीत रविवारी जनक्षोभ उसळला होता. हजारो लोक पोलिस ठाण्यासमोर जमले होते. नंतर त्या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेऊन जमावासमोर माफी मागण्यास भाग पाडले होते. त्यानंतर जमाव शांत झाला.
कॉन्स्टेबलचा चावा...
रातवाडो-नावाले येथे राहणाऱ्या नमितला रविवारी सकाळी महिला पोलीस कॉन्स्टेबल नोटीस देण्यासाठी गेली होती. त्यावेळी नमिताने त्या कॉन्स्टेबल महिलेच्या हाताचा चावा घेतला. या प्रकरणी नमितावर मडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली.